अचलपूर : जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातील गैरप्रकार रोखण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रयत्नशील असून त्यांनी यासाठी जनजागृती मोहीम सुरु केली असली तरी येथील सहायक उपनिबंधक कार्यालयातील गैरप्रकारावर काही एक परिणाम झालेला नसून हे कार्यालय भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे. येथील अधिकारी शासनाला दररोज लाखो रुपयांचा चुना लावून स्वत:चा खिसा गरम करीत आहे. या कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व दलालांना रंगेहात पकडल्यानंतरसुध्दा पुन्हा गेल्या काही दिवसांपासून खरेदी-विक्रीसाठी आलेल्या नागरिकांकडून अरेरावीने अवैध वसुली केली जात आहे. असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांपासून दलालांमुळे वादग्रस्त ठरलेल्या उपनिबंधक कार्यालय वर्ग-२ मधून शेती, प्लॉट, बंगला, खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार शेती,प्लॉट, बंगला, खरेदी-विक्री रजिस्टर करायचे असल्यास दर वाढवूून दिले आहेत. संपूर्ण दस्तऐवज विनातक्रार असावे, त्यानंतर प्लॉट, शेती किंवा बंगल्याची खरेदी-विक्री रजिस्टर शहरातील या उपनिबंधक कार्यालय वर्ग २ मध्ये करण्यात येणार असल्याचे फर्मान सोडले जाते. सातबारा कर्ज असल्यास खरेदी होत नाही. पण दलालांना १० हजार रुपये द्या आणि कशीही खरेदी अचलपुरात करुन घ्या, अशाही प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्यात. सदर कार्यालयात अमरावती जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतील खरेदी-विक्री रजिस्टर दस्तऐवज अधिक प्रमाणात केल्या जात आहे. विक्री करणारा बाहेरचा, खरेदी करणाराही अन्य गावचा असतांना जमानतदार मात्र शेकडो खरेदीवर एकच दिसतात. हे विशेष मंंत्रालयातून खास गुप्तचर खात्यामार्फत चौकशी झाल्यास येथील फार मोठा घोटाळा उघडकीस येऊ शकतो, याची साखळी फार मोठी आहे, असे लोक सांगतात. सहा उपनिबंधक कार्यालयात दलाल अधिकाऱ्यांची टोळी सक्रिय झाली असून उपनिबंधक याच्या अतिविश्वासातील आहे. घोटाळ्याच कामे यांच्यामार्फत केली जात असल्याची माहिती आहे. तसेच सातबारा पीआर कार्ड नसताना तसेच भोगवटदार क्रमांक २ च्या शेताचीही येथे खरेदी-विक्री केली जात असून येथील अधिकाऱ्यांवर अंकुश लावणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलले जाते. अचलपूर खरेदी विक्री उपनिबंधक कार्यालय वर्ग-२ हे गेल्या तीन वर्षांपासून तहसील कार्यालयातून भ्रष्टाचाराला चालना देण्यासाठी स्थानांतरित करण्यात आले होते. शासनाची इमारतीची डागडूजी पूर्ण झाली असतानासुध्दा मूूळ कार्यालयात कामकाज सुरू करण्यात आले नाही. (प्रतिनिधी)
उपनिबंधक कार्यालय बनले भ्रष्टाचाराचा अड्डा
By admin | Published: November 24, 2014 10:50 PM