चांदूर रेल्वे : पीएम आवास घरकुल योजनेतील निधीसाठी बैलबंडी, गाढवासह लाभार्थींनी आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखाली चांदूर रेल्वे नगर परिषदवर मंगळवारी डेरा आंदोलन केले. नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा निष्फळ ठरल्याने आंदोलकांनी नगर परिषद कार्यालय परिसरात डेरा टाकला आहे. जोपर्यंत निधीचे ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हे डेरा आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी आता घेतला आहे.
आंदोलनाचे नेतृत्व आम आदमी पार्टीचे पश्चिम विदर्भ संघटनमंत्री नितीन गवळी व नगर परिषदेचे माजी सभापती मेहमूद हुसेन यांनी केले. या आंदोलनात मुलबाळांसह लाभार्थी आंदोलनात सहभागी झाले आहेत. पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या तिसऱ्या टप्प्याच्या निधीसाठी लाभार्थींना नगर परिषदेच्या चकरा घालाव्या लागत आहेत. त्यामुळे लाभार्थींच्या मागणीनुसार तिसऱ्या टप्प्याच्या निधीसाठी आम आदमी पार्टीने निवेदन देऊन १४ जूनपर्यंत अल्टीमेटम दिला होता. तात्काळ निधी न मिळाल्यास १५ जूनला आंदोलनाचा इशारा नितीन गवळी व मेहमूद हुसेन यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी मेघना वासनकर यांना निवेदनातून देण्यात आला होता.
नव्याने मंजूर झालेल्या ४०५ घरकुल लाभार्थींनाही पहिला टप्पा देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, तरीही स्थानिक प्रशासनाकडून ठोस पावले न उलचल्याने डेरा आंदोलन करण्यात आले. सिनेमा चौकातील धर्मशाळेपासून आंदोलनाला सुरुवात झाली. चंद्रशेखर आझाद यांच्या पुतळ्याला हार्रापण करून आंदोलकांनी नगर परिषदकडे प्रस्थान केले. तेथे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांसोबत चर्चा करण्यात आली. मात्र, चर्चेमधून काहीही तोडगा न निघाल्याने अखेर आंदोलकांनी नगर परिषद परिसरात डेरा टाकला. यावेळी नितीन गवळी, मेहमूद हुसेन, विनोद जोशी, विजय रोडगे, शेख हसनभाई व काही लाभार्थींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जोरदार घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली.
वृत्त लिहिस्तोवर आंदोलन सुरूच होते. जया तायडे, उषा प्रजापती, कुसुम वऱ्हाडे, छाया मोरे, जया बेराड, माधुरी भेंडे, गोखे, गौतम जवंजाळ, गजानन चौधरी, भीमराव बेराड, गणेश क्षीरसागर, नीलेश गिरूळकर, चरण जोल्हे, पंकज गुडधे, संजय डगवार, विनोद लहाने, गोपाल मुरायते, नारायण गोल्हर, गजानन चांदेकर, दत्तु मंडलिक, दिलीप इमले, विजू तायडे, अजमतभाई यांच्यासह शेकडो लाभार्थी, शहरवासी आंदोलनात सहभागी झाले आहेत. पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे.
(बॉक्समध्ये घेणे)
1)
नेत्यांनी चर्चेसाठी यावे - नितीन गवळी
तीन महिन्यांपासून मुंबई येथे तिसऱ्या टप्प्याचे ३०२ कोटी ५० लाख रुपये निधी केंद्राकडून राज्याकडे जमा झाल्याचे पत्र आहे. एवढ्या दिवसापासून मात्र लाभार्थींपर्यंत सदर निधी पोहोचलेला नाही. नगर परिषद काँग्रेसची व राज्यात काँग्रेसप्रणीत सत्ता आहे. ते आतापर्यंत निधी का आणू शकले नाही व आता कधीपर्यंत निधी आणणार, याचे उत्तर काँग्रेस नेत्यांनी द्यावे व त्यांनी चर्चेसाठी यावे, असे नितीन गवळी यांनी म्हटले.
2)
नेते राहतात बंगल्यात
काँग्रेस नेत्यांच्या चार हजार चौरस फुटाच्या बंगल्यात केवळ तीन-चार सदस्य राहतात. पदाधिकारी, अधिकारीसुद्धा मोठ्या स्लॅबच्या घरात ऐशोआरामात राहतात. मग त्यांना या घरकुल लाभार्थींच्या गरिबीची काय जाणीव राहणार, असे रोखठोक मत नगर परिषदेचे माजी मेहमूद हुसैन यांनी व्यक्त केले.
3)
नगर परिषद आवारात पेटविली चूल, साहस संस्थेचे सहकार्य_
पीएम घरकुल आवास योजनेच्या निधीसाठी चांदूर रेल्वे नगर परिषदेत डेरा आंदोलन सुरू असून, दुपारी ३.३० वाजता नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांसोबत लाभार्थींची दुसरी चर्चासुद्धा निष्फळ ठरली होती. लाभार्थींनी नगर परिषद परिसरातच चूल पेटवून स्वयंपाक केला. आंदोलनाला साहस जनहितकारी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष चेतन भोले व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.
===Photopath===
150621\1654-img-20210615-wa0039.jpg~150621\img-20210615-wa0041.jpg
===Caption===
photo~photo