- संदीप मानकर
अमरावती : मांसाहेब जिजाऊंचे वडील लखुजी जाधव यांच्यासह त्यांची तीन मुले आणि नातवाची हत्या निजामाने केली. लखुजी जाधवांनंतरच्या पिढीतील वंशजही पराक्रमीच होते. तथापि, इतिहासकारांनी पराक्रमाचा हा इतिहास पुढे येऊ दिला नाही, अशी खंत या घराण्याचे १३ वे वंशज शिवाजीराजे जाधव यांनी येथे व्यक्त केली. राजमाता जिजाऊ यांच्या जाधव कुटुंबातील सदस्यांची हत्या झाली त्यावेळी मांसाहेबांनी त्यांचे भाचे संताजी ऊर्फ सुर्जनसिंह यांना सोबत नेले होते. त्याकाळी कुठलाही हत्ती चवताळला, तर त्याला तलवारीने काबूत करण्याचे हे पराक्रमी काम संताजी यांचा मुलगा शंभूसिंह करीत होते. शंभूसिंहांनी साडेतीनशे मावळे सोबत घेऊन बाजीप्रभू देशपांडेंसोबत पावनखिंडीत बलिदान दिले. पण, त्यांचे नाव इतिहासकार विसरले. छत्रपती शिवाजी राजे, संभाजी राजे यांच्यानंतर मराठ्यांचे नेतृत्व संपल्याचा समज मुघलांचा झाला होता. परंतु, सिंदखेडराजा येथील सेनापती धनाजीराव जाधव व संताजी घोरपडे यांच्या अफाट पराक्रमामुळे औरंगजेबाच्या सैन्यावर दहशत निर्माण झाली होती. या जोडीने महाराष्ट्रात मुघलांना आठ वर्षे झुंजवत ठेवले. त्यांनी यावेळी पिलाजी जाधवांच्या पराक्रमाचाही उल्लेख केला. सिंदखेडराजाबद्दल आम्ही ज्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात जाऊन सांगतो, त्यावेळी हे खरे आहे काय, असे विचारले जाते. इतिहासकारांच्या कृत्यामुळे इतकी वाईट स्थिती आज आपल्यावर आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सिंदखेडराजा येथे लखुजी जाधव यांनी त्याकाळी १४०० एकर जमिनीत तलाव बांधून शेतकºयांसाठी सिंचनाची व्यवस्था केली. आजही तो तलाव मोेठ्या अभिमानाने उभा आहे, अी माहिती त्यांनी दिली. रामसिंग भट नावाचे लखुजी जाधवांचे भट होते. त्यांनी लिहून ठेवलेले पुरावे उपलब्ध आहेत. ज्यावेळी राजमाता जिजाऊंचा जन्म झाला, त्यावेळी हत्तीवरून लोेकांना साखर वाटण्यात आली होती. आजच्या प्रगत युगात आम्ही स्त्रीभू्रणहत्या करतो. त्या काळात मुलीच्या जन्माचा उत्सव साजरा केला जात होता. जिजाऊ नसत्या तर शिवाजीराजे असते काय, असा सवाल करून खरा इतिहास नव्या पिढीसमोर यायला हवा. तरुणांनी पुढे येऊन इतिहास जाणून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.