अमरावती : जुन्या वादातून एका युवकावर गोळीबार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना गाडगेनगर ठाणे हद्दीतील अल अजीज हॉल ते नवसारी मार्गावर १७ फेब्रुवारीच्या रात्री घडली होती. याप्रकरणी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली असून, त्यापैकी गोळी झाडणाऱ्या एका आरोपीकडून पोलिसांनी शनिवारी रात्री गुन्ह्यात वापरलेला देशी कट्टा जप्त केला.
फिरोज खान ऊर्फ लच्छू वल्द अफोज खान (३०, रा. हबीबनगर) हा युवक या गंभीर हल्ल्यात जखमी झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. त्यापैकी मोहम्मद आबीद ऊर्फ अक्तार वल्द इकबाल हुसेन (४०, रा. वाहेदनगर) याच्याकडून देशी कट्टा जप्त केल्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी सांगितले. सदर आरोपीने घटनास्थळानजीक दारूच्या गोदामापलीकडे बंद घराजवळील गटारात सदर देशी कट्टा लपवून ठेवला होता.
गुन्ह्यात वापरलेला देशीकट्टा व घटनास्थळावर सापडलेले चार कार्ट्रेज तपासणीकरिता नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. तीनही आरोपींना २७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.