अमरावती : पाच दिवसातील जोरदार पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. शेतीलाही मोठा फटका बसला. सोयाबीन, कापूस, तूर, केळी, संत्रा आदी प्रमुख पिके वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात पाहणी करून पीक नुकसानाचा पंचनामा सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
१४ पैकी सहा तालुक्यात शेतीचे नुकसान झाले आहे. चांदूरबाजार वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये घरांची पडझड झाली. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील २० हजार हेक्टर शेती खरडून गेली, ३६९ घरांची पडझड झाली आहे. यापैकी नऊ घरे पूर्णत: पडली असून ३६० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, अतिवृष्टीने शेतात जाण्यासाठी मार्गही गवसत नाही, असे विदारक चित्र आहे. दुसरीकडे विमा कंपन्यांनी पिकांची भरपाई मिळण्यासाठी ७२ तासांच्या आत पंचनामे सादर करण्याचे फर्मान जारी केल्याने विमा काढूनही शेतकरी विम्यापासून वंचित राहतील, असे दिसून येत आहे.
-------------------
सहा तालुक्यांना जबर फटका
शेतीचे सर्वाधिक नुकसान दर्यापूर तालुक्यात झाले. या तालुक्यातील ५५५ हेक्टरमधील पीक बाधित झाले. त्याखालोखाल १२० हेक्टर शेती पिके धामणगाव रेल्वे तालुक्यात खराब झाली असून, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ९२, वरूड ७८, मोर्शी २० आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यातील १५ हेक्टरमधील शेती पिके खराब झालीत. अशाप्रकारे जिल्ह्याच्या सहा तालुक्यातील २० हजार हेक्टरमधील पिके खराब झालीत.
------------------
१२१ गावांमध्ये पावसाचा कहर
पाच दिवसाच्या संततधार पावसाने जिल्ह्यातील १२१ गावांमध्ये कहर केला. धामणगाव रेल्वे, भातकुली आणि तिवसा तालुक्यातील अनुक्रमे २७, २३ आणि २२ गावांमध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातले. त्यामुळे अनेक महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. यामुळे ३६९ घरांची पडझड झाली. यापैकी अमरावती व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रत्येकी तीन, वरूड, दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील प्रत्येकी एक अशाप्रकारे नऊ घरे पूर्णत: कोलमडली. ३६० घरांना अंशत: फटका बसला आहे.
-----------------------
अंशत: फटका बसलेले हे आहेत तालुके
अंशत: फटका बसलेल्यांमध्ये सर्वाधिक ८७ घरे तिवसा तालुक्यातील आहेत. भातकुली तालुक्यात ७६, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ५१, अमरावती तालुक्यात ४९, तर दर्यापूर तालुक्यातील ३३ गावांचा समावेश आहे. दोन-तीन दिवसांतील पावसामुळे जिल्ह्यात एक व्यक्ती वाहून गेला. मृत व्यक्ती अंजनगाव सुर्जी तालुक्यातील आहे.