अचलपूर : नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ११ व प्रभाग क्रमांक १० मधून जाणाऱ्या देवडी ते माळवेशपुरा गेट या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.
या रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, एवढे असून सुद्धा नगरपालिका प्रशासन कुंभकर्णी झोपेत कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दररोज लहान मोठे अपघात या रस्त्यावर होत आहे. अचलपूर नगरपालिका अंतर्गत येत असलेल्या देवडी अकबरी चौक जुना बस स्टॅन्ड बडी संगत छोटी संगत ते माळवेशपुरा गेट या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. अचलपूरचे नागरिक अमरावती, नागपूर, मोर्शी, चांदूरबाजार, वरूड याठिकाणी जाण्याकरिता याच मुख्य रस्त्याचा नेहमी वापर करतात. दररोज शेकडो दुचाकी सायकल ऑटो ट्रक या रस्त्याने ये-जा करतात. या मुख्य रस्त्यावरील डांबरीकरणाची अनेक ठिकाणी चाळण झाली आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी खड्ड्यात शिरल्याने पाण्याचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. त्यामुळे वाहने घसरून गटाऱ्यात पडून अपघात होत आहेत. रात्रीच्या अंधारात दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत.
खड्ड्यात विद्यार्थी, मुली, वृद्ध, अपंगांच्या सायकली व वाहने घसरून पडल्याचे प्रमाण वाढ होत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना पाठीच्या कण्याचा त्रास तसेच विकार जडले आहे. अचलपूर शहरातील हा डांबरी रस्ता अनेक वर्षांपासून असाच पडला आहे. त्याकडे नगरपालिका प्रशासन हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
180721\img_20210715_083353.jpg
अचलपूर येथील देवडी ते मानपुरा गेट रस्त्यात खड्डे खड्डे