चांदूर रेल्वे : १५ वर्षांपासून नगर परिषदेवर एकहाती सत्ता, त्यात स्थानिक निवासीच लोकप्रतिनिधी म्हणून पंधरा वर्षे कार्यरत असतानासुद्धा नाली, रस्ते व पिण्याच्या पाण्यापासून चांदूर रेल्वे शहर वंचित राहत आले आहे. शहराचा विकास हा केवळ खोटा व कागदपत्री असल्याचे मत पाहणीदरम्यान आमदार प्रताप अडसड यांनी व्यक्त केले.
३० वर्षांपासून पायाभूत नागरी सुविधा आम्हाला मिळाल्या नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी शहरातील काही भागातील नागरिकांनी आ. प्रताप अडसड यांच्याकडे केल्या होत्या. त्यावरून आ. प्रताप अडसड यांनी शहरातील काही भागांची पाहणी केली. पात्रीकर कॉलनी, महारूद्र कॉलनी, महालक्ष्मी कॉलनी, विक्रांत सोसायटी येथे नागरिकांच्या तक्रारी पाहणी केली असता, नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला.
धामणगाव येथे नगराध्यक्ष म्हणून कार्यरत असताना मी इतक्या मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करू शकतो, तर मग स्थानिक नगर परिषदेची एकहाती सत्ता असताना इथल्या नेत्यांना हे का शक्य नाही झाले? मुलांसाठी, वृद्ध नागरिकांसाठी ओपन स्पेसमध्ये गार्डन होण्याऐवजी जर घाणीचे साम्राज्य नागरिकांना स्वीकारावे लागत असेल, तर विकासापासून चांदूर रेल्वे नगर परिषद कोसोदूर आहे, असे आ. प्रताप अडसड म्हणाले. यावेळी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.