वरूड : वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांचे मोर्शी मतदारसंघावर दुर्लक्ष असल्याने केंद्रात सरकार असतानासुद्धा कुठलेही ठोस विकास काम झाले नाही. यामुळे पक्षाचे कार्यकर्ते दुरावले जात असल्याचा आरोप भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांनी केला आहे. काही युवा नेत्यांनीच आता खासदारांविरुद्ध रणशिंग फुंकल्याने निवडणुकीच्या तोंडावर खा. तडस अडचणीत येण्याची शक्यता आहे.
वर्धा लोकसभा मतदारसंघात वरूड-मोर्शी मतदार विधानसभा संघाची छाप नेहमीच राहिली आहे. नऊ वर्षांपासून या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व असताना खा. रामदास तडस यांच्याद्वारा कार्यकर्त्यांशी संपर्कसुद्धा अत्यंत कमी आहे. या भागाकडे दुर्लक्ष केल्याने केंद्र शासनाच्या योजना अथवा मोठे प्रकल्प राबविले गेले नसल्याचा या कार्यकर्त्यांचा आरोप आहे.
सन २०१९ च्या निवडणुकीत विधानसभेची जागा गमावल्याची खदखद कार्यकर्त्यांमध्ये आहे. भाजपची अवस्था चांगली असतानासुद्धा अंतर्गत हेव्या-दाव्यातून मतदारसंघ गमाविला गेल्याची वाच्यता खुद्द भाजपतील काही युवा कार्यकर्त्यांनी केली आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या एक वर्षापूर्वीच नाराजीचा बांध फुटायला सुरुवात झाली आहे. नाराज गटापैकी एकाने निवडणुकीसाठी उघडउघड आव्हान दिल्याने खासदार तडस यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
कार्यकर्त्यांना डावलून अन्य पक्षांना निधी
खारदास तडस यांच्या विकास निधीमधील कामे कमिशन दिल्याशिवाय मिळत नाहीत. निष्ठावान कार्यकर्त्यांना सोडून दलालामार्फत अन्य पक्षातील लोकांना निधी दिला आहे. विकास निधीकरिता पैशांची मागणी केली जात आहे. एकूणच खा. तडस यांनी तालुकाच वाऱ्यावर सोडल्याचा आरोप श्रीराव यांनी केला आहे.
निधी विकण्यासाठी पक्षाची खासदारकी?
स्थानिक विकास निधीअंतर्गत आवश्यक लहान-मोठी कामे होणे अपेक्षित असते. मात्र, केवळ संस्था आणि क्रीडा साहित्याकरिताच का निधी दिला जातो. ग्रामपातळीवर विकासकामांना निधी दिला जात नाही. निधीकरिता पैशाची मागणी केली जात असल्याने निधी विकण्यासाठी खासदारकी दिली काय, असा सवाल श्रीराव यांनी केला.
पुसला येथे रेल्वेचा थांबासुद्धा आतापर्यंत देता आलेला नाही. खा. तडस यांच्याद्वारा कार्यकर्त्यांना डावलून दलालामार्फत निधी विकला जात आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. विकास कामांची वाट लागली आहे.
- विजय श्रीराव, माजी जिल्हा उपाध्यक्ष, भाजप