अमरावती : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे रविवारी अमरावतीत युवा स्वाभिमानच्या दहीहंडी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. दिवसभर व्यस्तता, मुंबई परतण्याची घाई तरीही ना. देवेंद्र फडणवीस यांनी माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे यांच्या निवासस्थानी आयोजिलेल्या सत्कार सोहळ्यात आवर्जून उपस्थिती दर्शविली आणि प्रवीण पोटे भाजपत ‘ओक्के’ असा मेसेज दिला.
भाजप-सेना युती काळात आमदार प्रवीण पोटे हे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. अमरावती जिल्ह्यात भाजपचा ओबीसी चेहरा म्हणून आमदार पोटे यांच्याकडे वरिष्ठांनी मंत्रिपदाची सूत्रे सोपविली होती. आमदार पोटे हे राजकारणात येण्यापूर्वी हे समाजकारणी आणि उद्योजक म्हणून नावारूपास आले होते. जिल्ह्यात ‘भाऊ’ अशी ओळख असलेल्या प्रवीण पोटे यांनी भाजपमध्ये सुद्धा तीच ओळख कायम ठेवली आहे. शहर, जिल्हा भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ता असो वा महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद सदस्यांमध्येही आमदार पोटे यांची लोकप्रियता कायम आहे. म्हणूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दोन्ही नेते सत्कार सोहळ्याला उपस्थित राहिले आणि भाजपत आमदार प्रवीण पोटे यांची राजकीय उंची कायम आहे?, हे स्पष्ट केले. दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलाबपुष्पाचा भला मोठा हार टाकून ना. फडणवीस, बावनकुळे, पोटे या तिन्ही नेत्यांचा भावपूर्ण सत्कार केला.
'एक बूथ, टेन युथ' संकल्प करा : फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका भाजपची सत्ता कशी राहील, याचे सूक्ष्म नियोजन करा. 'एक बुथ, टेन युथ' याद्वारे 'कमळ' घराघरात पोहोचवा, असा कानमंत्र दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आमदार प्रवीण पोटे यांच्याकडे वेगळी जबाबदारी दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. कुणी काहीही बोलले तरी आधी भाजप नंतर सर्वकाही असे आपले धोरण आहे, हेदेखील सांगायला ते विसरले नाहीत, हे विशेष.