अमरावती : अमरावतीत १२ नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेला मोर्चा हा चुकीच्या माहितीच्या आधारे आयोजित करण्यात आला. हा संपूर्ण घटनाक्रम अत्यंत दुर्दैवी आहे, याची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज अमरावतीत बोलत होते.
त्रिपुरा येथील कथित प्रकरणानंतर अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून आला होता. यामध्ये अनेक आस्थापनांची तोडफोड करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आज रविवारी अमरावती परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली.
इतके मोठे मोर्चे राज्यातील वेगवेगळ्या शहरात एकाच दिवशी निघतात, अमरावतीमध्ये १२ नोव्हेंबर रोजी निघालेल्या मोर्चाला परवानगी होती का, किती लोकांना परवानगी देण्यात आली, कोणी परवानगी दिली? याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. फेक न्युजच्या आधारे हे मोर्चे प्लॅन केले गेले. समाजाला भडकवण्यात आलं. दंगल भडकवण्यासाठी समाजकंटकांनी एका विशिष्ट समुदायाच्या आस्थापनांना, लोकांना टार्गेट करण्यात आलं. असे सांगत १२ तारखेची घटना घडली नसती तर १३ तारखेची घटना घडली नसती असेही फडणवीसांनी म्हटले.
कुठल्याच हिंसेंच समर्थन केल जाऊ शकत नाही. मात्र, पोलीस १३ तारखेला घडलेल्या घटनेवर कारवाई करत आहेत. परंतु, १२ तारखेच्या मोर्चाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, हे अत्यंत चुकीचे असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. यासोबतत, भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी एकतर्फी कारवाई केली असून असून त्यांना मारहाणही करण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले. एकतर्फी कारवाई करायची असेल, खोट्या गुन्ह्यात अडकावयाचे असेल तर आम्ही भाजप पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांसह जेलभरो आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला.