मनीष तसरे
अमरावती : गुरुवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५५व्या पुण्यतिथी महोत्सवात देश-विदेशातून आलेल्या भाविकांनी ठीक ४ वाजून ५८ मिनिटांनी राष्ट्रसंतांना गुरुकुंज मोझरीत मौन श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण भारतात अशाप्रकारे एखाद्या संत महात्म्याला इतक्या शिस्तबद्धरित्या पाच लाख भाविकांच्यावर उपस्थित राहिलेल्या भाविकांनी एकाचवेळी मौन श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा देशातील एकमेव कार्यक्रम आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही या महोत्सवामध्ये विविध प्रकारचे सामाजिक, धार्मिक, प्रबोधनात्मक, राज्यस्तरीय कीर्तन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा सर्व कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला. एक दिन सारा जगत गुरुदेव सेवामंडल की शिक्षा और दीक्षा पायेंगा।' या राष्ट्रसंतांच्या भाकितानुसार श्रद्धांजलीला अमेरिका, इंग्लंड, जॉर्जिया, जर्मनी, कॅनेडा, दक्षिण ऑर्फिका इत्यादी देशातील राष्ट्रसंत विचार प्रणालीचे अभ्यासक व परदेशी नागरिक आर्वजून उपस्थित होते.
तुकडोजी महाराजांनी संतांच्या विचारातील राष्ट्र निर्माणाची भावना, विश्वधर्माच्या प्रसाराचे कार्य आणि मानवतावादी प्रेरणेचा विचारप्रवाह आधुनिक काळामध्ये पुढे नेण्याचे कार्य केले. त्यांचे महाराष्ट्र आणि देशाच्या पुनर्निर्माणासाठी फार मोठे योगदान आहे.