लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : अंध अपंगांना अन्न, वस्त्र या मूलभूत सेवा देण्याचे कार्य श्री संत गाडगेबाबांनी ११० वर्षांपूर्वी हाती घेतले. त्याची सुरुवात भातकुली तालुक्यातील ऋणमोचन येथील मुद्गलेश्वर मंदिरातून केली होती. हजारो अंध - अपंगांना अन्नवस्त्र देण्याचे कार्य आजही ऋणमोचन यात्रेत अविरतपणे सुरू आहे. त्याच मालिकेत ऋणमोचन यात्रेच्या शेवटच्या आठवड्यात रविवारी अंध-अपंगांचा अक्षरश: कुंभमेळा भरला होता.संत गाडगे महाराजांच्या मामांच्या या गावात पूर्णा नदीकाठी मुद्गलेश्वर मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी पौष महिन्यातील पहिल्या रविवारी यात्रा प्रारंभ होते. ही यात्रा जवळपास एक महिना राहते. ११० वर्षांपूर्वी संत गाडगेबाबांनी सुरू केलेली ही परंपरा २००२ पर्यंत अच्युतराव ऊर्फ दादासाहेब देशमुख यांनी सांभाळली. त्यानंतर मुंबईस्थित संत गाडगेबाबा मिशनचे सचिव बापूसाहेब देशमुख त्यांच्या पुढाकाराने दरवर्षी ऋणमोचन यात्रेत अंध-अपंग व निराधारांना अन्नवस्त्र वाटपाचे काम सुरू आहे.याठिकाणी मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, जळगाव, चंद्रपूर, अमरावती, अकोला, दर्यापूर, नागपूर अशा अनेक गावांमधून अन्नदात्यांचे मोलाचे सहकार्य लाभते. तसेच अमरावती येथील व्यापारी असोशियनच्यावतीने विजय कासट, अकोला येथील जवाहर भाई, दर्यापूर येथील पनपालिया, मूर्तिजापूर येथील व्यापारी मंडळींनीसुद्धा मोलाचे सहकार्य केले, असा दानशुरांनी ऋणमोचन यात्रेत हजारो अंध, अपंग निराधारांना अन्ना वस्त्राचे वाटप केले यात्रेस सात ते आठ हजार अपंगांना धोतर, साड्या, लुगडे वाटण्यात आल्या. दानशूर यांनीसुद्धा पूर्णवेळ राहून या यात्रेत दिव्यांगांची सेवा केली. संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, सचिव गजानन देशमुख, सहसचिव दिनेश वानखडे, सदस्य प्रकाश महाले, सागर देशमुख यांसारख्या अनेक लोकांनी मोलाचे सहकार्य केले. यात्रेत कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी दर्यापूरचे ठाणेदार मुकुंद ठाकरे व भातकुली पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्या कडक बंदोबस्त लावण्यात आला होता.
ऋणमोचन यात्रेत भक्तांचा जनसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 10:57 PM
अंध अपंगांना अन्न, वस्त्र या मूलभूत सेवा देण्याचे कार्य श्री संत गाडगेबाबांनी ११० वर्षांपूर्वी हाती घेतले. त्याची सुरुवात भातकुली तालुक्यातील ऋणमोचन येथील मुद्गलेश्वर मंदिरातून केली होती.
ठळक मुद्देअंध-अपंगांचा मेळा : ११० वर्षांपासून अन्न व वस्त्र वाटपाची परंपरा