गुरुकुंज (मोझरी) अमरावती : आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५४ व्या पुण्यतिथी महोत्सवात देश-विदेशातून आलेल्या भाविकांनी ठिक ४ वाजून ५८ मिनिटांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना गुरुकुंज आश्रमात मौन श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण भारतात अश्याप्रकारे एखाद्या संत महात्म्याला इतक्या शिस्तबद्धरित्या पाच लाख भाविकांच्यावर उपस्थित राहिलेल्या भाविकांनी एकाचवेळी मौनश्रद्धांजली अर्पण
करण्याचा हा देशातील एकमेव कार्यक्रम असून या नियोजनाची प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा केली. 'एक दिन सारा जगत गुरुदेव सेवामंडल की शिक्षा और दीक्षा पायेंगा।' या राष्ट्रसंतांच्या भाकितानुसार श्रद्धांजलीला अमेरिका, इंग्लंड, जॉर्जिया,जर्मनी, कॅनेडा, दक्षिण आर्फिका इत्यादी देशातील राष्ट्रसंत विचार प्रणालीचे अभ्यासक व परदेशी नागरिक आर्वजून उपस्थित होते.
राष्ट्रसंतांचे महानिर्वाण मराठी पंचागानुसार अश्विन वद्य पंचमीला (इंग्रजी पंचागानुसार शुक्रवार ११ ऑक्टोंबर १९६८साली) सायंकाळी ४ वाजून ५८ मिनिटांनी झाले होते. तेव्हा पासून राष्ट्रसंतांना त्यांच्या विचारांचे सर्व धर्म पंथातील राष्ट्रसंत प्रेमी व भाविक-भक्त या दिवशी तन्मयतेने श्रीक्षेत्र गुरुकुंजात एकत्र येवून अश्विन वद्य पंचमीला श्रद्धांजली अर्पण करतात. गेल्या ५३वर्षापासून अविरतपणे राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. राष्ट्रसंतांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्यावतीने यासाठी जय्यत तयारी केली जाते. इंग्रजांच्या विरोधात राष्ट्रसंतांनी १९४२ च्या चलेजाव उठावात सक्रीय सहभाग घेतला होता. त्यावेळी चिमूर, आष्टी, यावली, बेनोडा, चंद्रपूर येथे इंग्रजांनी बेछूट केलेल्या गोळीबारात अनेकजण शहीद झाले व महाराजांना तुरूंगात टाकल्या गेले.
'पत्थर सारे बॉम्ब बनेंगे भक्त बनेंगी सेना, झाड झडूले शस्त्र बनेंगे नाव लगेंगी किनारे’ हे जाज्वल्यपूर्ण भजन महाराजांनी इंग्रजांच्या विरोधात म्हणून मोठी जन चळवळ उभारली होती. सुमारे दोन तास लाखांचा जनसमुदाय राष्ट्रसंतांच्या विश्वात्मक विचार व कार्याचा, त्यातून भासणाच्या त्यांच्या दिव्यत्वाचा अनुभव घेत ध्यानस्थ बसलेला होता. महाद्वारावरील विशालकाय घंटेच्या निनाद होताच ठिक ४ वाजून ५८ मिनिटांनी शिस्तबद्ध रितीने श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी काही क्षणासाठी राष्ट्रीय महामार्गावरील वरील वाहतुक थांबविण्यात येवून दुकानांतील व्यवहार, भोंगे स्वतःहून बंद करण्यात आल्यामुळे सर्वत्र निरव शांतता पसरली होती. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मौनश्रद्धांजलीचा नयनरम्य सोहळा पार पडला. यावेळी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाचे संचालक मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पा बोंडे, सर्वाधिकारी प्रकाश वाघ, उपसर्वाधिकारी लक्ष्मण गमे, प्रचार प्रमुख दामोदर पाटील, सरचिटणीस जनार्दन बोथे, श्रीगुरुदेव सेवामंडळाचे सर्वप्रचारक, कार्यकर्ते उपस्थित होते. श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे नियोजन आध्यात्मिक विभाग प्रमुख डॉ. राजाराम बोथे यांनी केले.