आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल, नागपूर रेल्वे स्थानकातून घेतले ताब्यात
धारणी (अमरावती) : मेळघाटातील गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा अंतर्गत येणाऱ्या हरिसालच्या वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना अटक करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्यांना नागपूर रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. मृत चव्हाण यांचे पती राजेश मोहिते यांच्या तक्रारीवरून गुरुवारी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास धारणी पोलिसांनी डीएफओ विनोद शिवकुमार यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला. वनविभाग नव्हे तर, सोशल मीडियावर ‘जस्टिस फॉर दीपाली चव्हाण’ अशी मागणी बुुलंद झाली आहे. विनोद शिवकुमार यांच्या सोबतच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एस.एम. रेड्डी यांच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गुरुवारी सायंकाळी ७ वाजता दरम्यान दीपाली चव्हाण यांनी त्यांच्या हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी छातीवर सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. त्याबाबत त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी गुगामाल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचे नमूद आहे. या प्रकरणाने वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे. आएफएस व नॉन आयएफएसचा मुद्दादेखील ऐरणीवर आला आहे. दीपाली चव्हाण या दोन वर्षांपासून हरिसाल येथे कार्यरत होत्या. आरोपी विनोद शिवकुमार हे गुगामल वन्यजीव विभागात उपवनसंरक्षक पदावर कार्यरत आहे. दीपाली चव्हाण यांचे पती राजेश भाईदास मोहिते (३०, रा. मोरगाव, ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती, हल्ली मुक्काम हरिसाल) हे चिखलदरा येथे कोषागार कार्यालयात नोकरीला आहे. त्यांनीसुद्धा गुरुवारी मध्यरात्री ३ वाजता पत्नी दीपाली चव्हाण हिला उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्याने तिने गोळी झाडून आत्महत्या केल्याची तक्रार धारणी पोलिसांत दिली आहे.
शवविच्छेदन अमरावतीला
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ संजय काळे, ठाणेदार विलास कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गीते, पीएसआय मंगेश भोयर, पीएसआय हर्षल चाफले, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्राथमिक तपास सुरू केला. त्यांनतर त्यांचा मृतदेह हरिसाल येथून ११ वाजता दरम्यान धारणी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अमरावती येथे शवविच्छेदनाचा सल्ला दिल्याने त्यांचा मृतदेह तेथेच रुग्णवाहिकेत ठेवण्यात आला. त्यानंतर त्यांचे पती राजेश मोहिते हे पोलिसांत तकार देण्याकरिता पोहचले. त्यांची तक्रार मध्यरात्रीच पीएसआय सुयोग महापुरे यांनी नोंदवून घेतली. त्यांनतर पोलीस बंदोबस्तात मृतदेह अमरावती येथे नेण्यात आला. तेथे त्याचे शुक्रवारी दुपारी शव विच्छेदन करण्यात आले. त्यांनतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोरगाव या राजेश मोहिते यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार होणार आहे.
जिल्ह्यात नाकाबंदी
दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमध्ये उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारचे नाव असल्याची खात्री झाल्यानंतर अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांच्या आदेशाने संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली. अकोला, बुलडाणा, यवतमाळ व नागपूर या जिल्ह्यांना सतर्क करण्यात आले. आरोपी विनोद शिवकुमारचा शोध घेण्यासाठी धारणी पोलिसांसह ग्रामीण पोलिसांनी चार पथके निर्माण करण्यात आली. अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय व पीएसआय विजय गराड यांच्या पथकाने आरोपी विनोद शिवकुमार याला नागपूर रेल्वे स्टेशनहून अटक केली.
सुसाईड नोटमध्ये काय?
आरएफओ दीपाली चव्हाण यांनी ज्या शासकीय निवासस्थानी आत्महत्या केली, तेथून धारणी पोलिसांनी चव्हाण यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्या नावे लिहिलेले तीन पानी पत्र जप्त केले. प्रशासकीय कामकाजादरम्यान दिलेला त्रास, रात्री बेरात्री संकुल, अकोट फाट्यावर बोलावून एकटेपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न, सहकाऱ्यांदेखत होणारी अश्लील शिवीगाळ, विनोद शिवकुमार यांनी गर्भावस्थेत जाणूनबुजून जंगल फिरविल्याने झालेला गर्भपात, त्यामुळे झालेला, होणारा मानसिक त्रास यातून माझ्या आत्महत्येला विनोद शिवकुमार हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई कराल, हीच शेवटची इच्छा. जे माझ्यासोबत झाले, ते यापुढे इतर कुणासोबत होऊ नये, असे लिहित त्याखाली चव्हाण यांनी स्वाक्षरी केली आहे.
---------------