धामणगाव रेल्वे : तालुक्यात २५ वर्षांच्या आतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. तालुक्यात पाच दिवसांत ८० कोरोनाग्रस्त निष्पन्न झाले. हिरपूर हे गाव कोरोनाचे हे हॉटस्पॉट बनले आहे.
धामणगाव रेल्वे तालुका हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. एक हजारांहून अधिक रुग्णांची नोंद तालुक्यात झाली आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक संख्या २५ वर्षांखालील युवकांची पुढे आली आहे. कोरोना चाचणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. ताप, अशक्तपणा, सर्दी, खोकला अशी लक्षणे त्यांच्यात आढळून येत आहेत.
धामणगाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. रविवारी हिरपूर या गावात तब्बल १७ कोरोनाग्रस्त असल्याची नोंद शासकीय प्रयोगशाळांच्या अहवालावरून घेण्यात आली. यात अल्प वयीनांची संख्या अधिक आहे. प्रत्येक नागरिकाने आता कोरोनाबाबत हेळसंड करू नये, मास्क, हात धुणे, शारीरिक अंतर अशी काळजी घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर यांनी केले आहे.