धामणगाव रेल्वे - उपचाराने प्रकृतीत सुधारणा नाही, तर अन्य रुग्णालयात नेण्यासाठी परवानगी मिळत नाही; यामुळे धामणगाव येथील एका पोलीस कर्मचा-याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. रिलिव्हिंग ऑर्डर मिळविण्यासाठी अपघातग्रस्त कर्मचा-याची पत्नी शासकीय उंबरठे झिजवत आहे.
धामणगाव येथील दत्तापूर ठाण्यातील नायक पोलीस शिपाई सूरजसिंह चंदेल हे ८ नोव्हेंबर रोजी शासकीय कामानिमित्त सेवाग्रामला जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकी धडक दिली़ गंभीर जखमी झाल्याने त्यांना वर्धा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना पोलीस विभागाकडून मान्यताप्राप्त नागपूर येथील खासगी इस्पितळात हलविण्यात आले.
मागील १३ दिवसांपासून सूरजसिंह उपचार घेत आहेत. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना अन्य खासगी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, अद्याप रिलिव्हिंग रिपोर्ट मिळाला नाही. त्यांच्या उपचारावर दररोज १५ ते २० हजार रुपये खर्च होत आहे. आता मदतनिधीही संपला आहे. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी पुढाकार घेऊन मदत करावी, अशी मागणी त्यांच्या पत्नीने केली आहे.
उपचारानंतरही पतीच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. ते मृत्यूशी झुंज देत आहेत. उपचारासाठी रिलिव्हिंग रिपोर्टची गरज आहे. मात्र, तो दिला जात नाही. किती चकरा मारायच्या? शासनाने त्वरीत दखल घ्यावी.- मालिनी चंदेल, पत्नी