धामणगाव रेल्वे : आठ दिवसांत पाच गावे कोरोना हॉटस्पॉट बनली असून, तब्बल ५०० हून अधिक ग्रामस्थ पॉझिटिव्ह आढळले आहेत. ‘ना तोंडाला मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग’ अशी ग्रामीण भागातील नागरिकांची अवस्था आहे. त्यातच अनेकजण दिवसभर कट्ट्यावर गप्पा मारत असताना कोरोना समित्या केवळ कागदावरच असल्याने ग्रामस्तरावर होणारा कोरोनाचा फैलाव रोखणार कसा, असा सवाल उपस्थित झाला आहे.
धामणगाव तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसत आहे. सोनेगाव खर्डा, हिरपूर, सालनापूर, कळाशी, जानकापूर, तळेगाव दशासर यासह अनेक गावे कोरोना हॉटस्पॉट बनली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, गावात समन्वय राहावा, दुसऱ्या गावातील एखादी व्यक्ती जरी गावात येत असेल तरी त्याची नोंद घेणे, गावात कोरोना पॉझिटिव्ह निघाला तर तो गृहविलगीकरणात आहेत की, नाही यावर लक्ष ठेवणे, मास्कचा वापर व्हावा, यासाठी राज्य शासनाने प्रत्येक गावात ग्राम समितीची स्थापना केली. मात्र, कोरोना समितीला आपले अधिकार काय याची माहिती नसल्याचे पाहायला मिळत आहे. या समितीच्या डोळ्यासमोर लॉकडाऊनच्या काळात अनेक जण कट्ट्यावर बसलेले दिसत असताना गावात जवळच्या व्यक्तीशी कशाला वाद घालायचा, त्यामुळे ही समिती लक्ष देत नसल्याचे चित्र आहे.
संपूर्ण गाव बाधित झाल्यानंतर येणार काय जाग?
कोरोनाचे संकट हे मानव जातीवरील अस्तिवाचे संकट आहे. राज्यात दिवसेंदिवस कोराना मृतांची संख्या वाढत आहे. ४०- ४५ वर्षांतील व्यक्तींचे कोरोनामुळे जीव जात आहे. तरीही ग्रामीण भागात शासनाच्या त्रिसूत्रीचे पालन होताना दिसत नाही. संपूर्ण गाव कोरोना बाधित झाल्यानंतर ग्रामस्थांना जाग येईल का, असा सवाल रात्रंदिवस काम करणाऱ्या प्रशासनातील कोरोना योद्ध्यांनी निर्माण केला आहे.
संचारबंदी कागदावरच!
राज्य शासनाने १ मे पर्यंत कडक निर्बंध व संचारबंदी लागू केली असून, संचारबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासन व स्थानिक समित्यांवर जबाबदारी दिली आहे. मात्र, गावात किराणा दुकान, भाजीपाला, जनरल स्टोअर्स खुले राहतात. एकीकडे पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता तर दुसरीकडे समित्यांनाही गावातील दुकानचालक जुमानत नसल्याने संचारबंदी कागदावरच असल्याचे पहायला मिळत आहे. किमान लॉकडाऊन काळात तरी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे असल्याचे मत तहसीलदार गौरवकुमार भळगाठींया यांनी व्यक्त केले आहे.
कोट
धामणगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ग्रामस्थ आजही या आजाराला एक करमणूक समजत आहे. काही दिवसांत प्रत्येकाने काळजी न घेतल्यास ही परिस्थिती आटोक्याबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही.
- हर्षल क्षीरसागर,
तालुका आरोग्य अधिकारी, धामणगाव रेल्वे
कोट २
धामणगाव शहरात लॉकडाऊन काळात रात्रीला फिरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कोरोनाचे दिवसागणिक रुग्ण वाढत आहे. आतातरी दुसऱ्याच्या जीवाशी खेळणे बंद केले पाहिजे.
- महेश साबळे,
वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय