पहिला दिवस
धामणगाव रेल्वे : शासनाने यंदाच्या शैक्षणिक सत्राला आजपासून सुरुवात झाली असली तरी इयत्ता दहावी व बारावीच्या दीड हजार विद्यार्थ्यांची पहिल्या दिवशी पाटी कोरीच होती. या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात आले नाही. यादरम्यान या वर्गाला शिकवणाऱ्या १२ शिक्षकांनी शाळा-महाविद्यालयांना दांडी मारली असल्याचे समोर आले आहे.
धामणगाव तालुक्यात इयत्ता दहावी व बारावीची २९ शाळा-कनिष्ठ महाविद्यालये आहेत. ‘लोकमत’ने संबंधित शाळा-महाविद्यालयात रिॲलिटी चेक केली असता, पहिल्या दिवशी वेळापत्रकाप्रमाणे इयत्ता बारावीचे कनिष्ठ महाविद्यालये तीन ठिकाणी सकाळी साडेसात वाजता सुरू झाली. मात्र, कुणीही ऑनलाइन वर्ग घेतले नाही. विशेष म्हणजे, सकाळी ११ वाजता दहावीचे वर्ग असलेल्या काही शाळांना ‘लोकमत’ने भेट दिली असता, शिक्षक विद्यार्थ्यांची नावे हजेरीपटावर पाहण्यापेक्षा मोबाईलवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा पाहत होते. शाळेचा पहिला दिवस असल्याने नियोजन केले नाही, पुढील दोन ते तीन दिवसांत ऑनलाइन वर्ग सुरू करू, असे प्रामाणिक मत काही शिक्षकांनी व्यक्त केले. मात्र, संबंधित शाळांना इयत्ता आठवीचे वर्ग समाविष्ट असल्याने तालुक्यातील खासगी शाळांतील बारा शिक्षकांनी पहिल्या दिवशी दांडी मारली होती. प्राथमिक शाळेचे यापेक्षा उलट चित्र होते. ८१ शाळांतील शिक्षक पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी पुष्पगुच्छ घेऊन स्वागतासाठी पोहोचले होते.