गणेश वासनिक, अमरावती: अनुसूचित जमातीच्या सूचित ‘धनगर’ शब्द नाहीच. धनगर ही ‘जात’ आहे, ‘जमात’ नाही. मुंबई उच्च न्यायालयाने नाकारल्यानंतरही राज्य सरकार धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या सूचित समावेश करण्यासाठी धनगर, धनगड एकच असल्याचा जीआर कसा काय काढता, असा आक्षेप ट्रायबल फोरमचे राज्य उपाध्यक्ष अजाबराव उईके यांनी घेतला आहे.
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी कायद्याच्या विहित पद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. ही बाब चुकीची आहे. मताच्या राजकारणासाठी धनगर आणि आदिवासी समाजाची फसवणूक करू नका, असे आवाहन अजाबराव उईके यांनी राज्य सरकारला १६ सप्टेंबर रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे केले आहे.
१९११च्या जनगणनेमधील तक्ता क्रमांक ६ केवळ जातीचा आहे. त्यामध्ये क्रमांक ७वर धनगर ‘जात’ म्हणूनच नोंद आहे. १९११ मध्ये बाॅम्बे प्रेसिडेन्सी, सी. पी. ॲण्ड बेरार, मराठवाडा या तीन प्रातांत धनगर ‘जात’ म्हणूनच उल्लेख आहे. १९३१ची जनगणना जे. एच. हट्टन यांनी केली आहे. ते १९२९ ते १९३३ पर्यंत जनगणना आयुक्त होते. त्यांच्या जनगणनेचा खंड ३ मध्ये पान क्रमांक ६६वर हट्टन यांनी भटक्या जातीचा तक्ता दिलेला आहे. त्यामध्ये क्रमांक ४वर धनगर जात आहे. खंड दोनमध्ये पान क्रमांक १६६ वर जात क्रमांक ३०वर ‘गडरीया’ नावाच्या मुख्य जातीची नोंद आहे. त्यांच्या उपजातीची नावे भाखड, धनगर आहे. ‘धनगर ही जात आहे, जमात नाही.’
डॉ. विकास महात्मे यांच्या प्रश्नाला सरकारचे उत्तर
धनगरांना अनुसूचित जमातीची प्रमाणपत्रे मिळावी म्हणून १६ नोव्हेंबर २०१६ रोजी राज्यसभेत तत्कालीन खासदार डॉ. विकास महात्मे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी ‘एसटी’ जमातीच्या यादीत क्र. ३६वर ओरॉन, धांगड असून, धनगर समूह राज्यात अनुसूचित जमातीच्या यादीत नाहीत, असे उत्तर त्यांना मिळाले होते.