निरंकुश वाहतूक : रस्ता सुरक्षा अभियानाची केवळ औपचारिकताचसुनील देशपांडे अचलपूरप्रादेशिक परिवहन तथा वाहतूक विभागातर्फे रस्ता सुरक्षा अभियान मागिल आठ दिवसांपासून राबविले जात आहे. मात्र, अचलपूर शहरात हे अभियान केवळ औपचारिकता ठरले आहे. शासनाचा दरवर्षीचा कार्यक्रम म्हणून याकडे पाहिले जात असून वाहतुकीत कुठलाही सुरळीतपणा आलेला नाही. अवैध वाहतूक बिनबोभाट सुरु आहे. युवकवर्ग धूम स्टाईल सुसाट गाड्या पळविताना दिसत असून वाहतूक पोलीस मात्र गप्प आहेत. शहरातून सद्यस्थितीत सुरू असलेली अवैध वाहतूक, शहरातील बेशिस्त वाहतूक, काही रस्त्यांवर दुकानाबाहेर दुकानदारांनी ठेवलेले सामान तसेच जाहिरातीचे फलक आदींमुळे पोलिसांची निष्क्रियता वारंवार चव्हाट्यावर येत आहे. १० जानेवारीपासून प्रादेशिक परिवहन व वाहतूक पोलिसांतर्फे रस्ता सुरक्षा अभियानाला सुरूवात झाली आहे. हे अभियान २४ जानेवारीपर्यंत राबविले जाणार आहे. अचलपूर शहरात मुख्य रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी, सत्त होणारे लहान-मोठे अपघात, अवैध वाहतूक, आॅटोरिक्षाधारकांची बेशिस्त वाहतूक, मनमानी पध्दतीने जागा मिळेल तेथे आॅटोरिक्षा ट्रकचे पार्किंग, अल्पवयीन वाहनधारकांचा सुळसुळाट, त्यांचे धूम स्टाईल वाहने पिटाळणे, विना परवाना वाहने चालविणे यावर कुठलाही अंकुश लागलेला नाही. जुळ्या शहरात आजही कित्येक आॅटोरिक्षा बिना पासिंग धावत आहेत. काहींना नंबर नाहीत, चित्रविचीत्र हॉर्न आहेत. बहुतांश वाहकांना कर्णकर्कश हॉर्न आहेत. रात्री- बेरात्री रेतीने भरलेले ट्रक धावत असतात. या बाबींकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष का करतात, असा जनतेचा खडा सवाल आहे?दुकानदारांनी रस्त्यांवर केलेले अतिक्रमण किंवा आणून ठेवलेल्या वस्तू वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. मात्र, यावर कारवाई केली जात नाही. मागील तीन महिन्यांपूर्वी अचलपूरचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे, परतवाड्याच्या तत्कालीन महिला ठाणेदार रिता उईके यांनी अल्पवयीन वाहनधारकांकवर कारवाईची मोहीम उघडली होती. ती जेमतेम एक महिना चालली. मात्र, सुसाट वाहने चालविणाऱ्यांवर अजुनही कोणी कारवाई केल्याचे दिसत नाही. सरमसपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत गांधी पुलावरील चौकात वाहनधारक मनमानी पध्दतीने वागतात. कोठेही वाहने उभी करतात, लोटगाड्या, फळांच्या गाड्याही भर रस्त्यात उभ्या असतात. याकडे पोलिसांचे पूर्णपणे दुर्लक्ष सुरू आहे. जुळ्या शहरात ठिकठिकाणचे चौक व मुख्य रस्त्याच्या कडेला असलेले जाहिरात फलकही अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. बसस्थानक मार्ग, तहसील मार्ग, अचलपूर-परतवाडा मार्ग, विदर्भ मिल स्टॉप, जयस्तंभ चौक आदी भागात असलेले मोठमोठे शुभेच्छा व दुकानांचे जाहिरात फलक लावलेले आहेत. त्यामुळे एखादा मोठा अपघात घडू शकतो. यावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त आम्ही विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रचार फेरी काढली, हॅन्डबिल वाटले, शाळेत मार्गदर्शनपर कार्यक्रम घेतले. यामुळे नियमांबाबत जनजागृती होईल. अवैध वाहतुकीवर कारवाई रोज सुरू असते. अल्पवयीन वाहनधारकांना आधी समज देऊन नंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. जाहिरात फलक हा विषय पालिका व बांधकाम विभागाचा आहे. त्यांनाही याबाबत पत्र लिहून कळविण्यात येईल. - सुरेश कन्नाके, वाहतूक निरीक्षक, अचलपूर
धूम स्टाईल वाहनधारकांचा हैदोस
By admin | Published: January 20, 2016 12:31 AM