अमरावती : अतिसार किंवा डायरिया आजाराने पाच वर्षापर्यंतच्या बालकांचे मृत्यूचे प्रमुख कारण आहे. दहा टक्के बालके हे अतिसाराने दगावतात आणि यामुळे बालमृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते. या आजारांपासून बालकांचे संरक्षण व्हावे यासाठी १५ ते ३० जुलै हा पंधरवाडा ‘विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा’ म्हणून आरोग्य विभागाव्दारे राबविले जाणार आहे.
यामध्ये आजारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी आरोग्य विभागाव्दारे उपचार प्रक्रियेसंबंधी जनजागृती करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पालक किंवा काळजी वाहकांमध्ये अतिसार (डायरिया) तसेच कोविड-१९ आजाराच्या प्रतिबंध आणि व्यवस्थापन विषयक योग्य वर्तणूक बिंबविण्या संदर्भात जागृती करण्यात येणार आहे. अतिसार असलेल्या बालकांमध्ये ओआरएस आणि झिंक वापराचे प्रमाण जास्तीत जास्त होईल याची सुनिश्चिती करणे, सामाजिक व आरोग्य संस्था स्तरावरील बालकांमधील अतिसाराच्या रुग्णांचे उपचार मार्गदर्शक सूचनेनुसार होईल याची खात्री करणे आदी या पंधरवाड्याचे उद्देश आहे.
अतिसार आजाराचे व्यवस्थापन व उपचारासंबंधी पुढीलप्रमाणे जनजागृतीपर संदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार बालकाला अतिसार झाल्याबरोबर (एका दिवसात तीनपेक्षा जास्त वेळा जुलाब होणे) लगेच ओआरएसचे द्रावण आणि इतर द्रव पदार्थ द्यावे. तसेच अतिसार थांबेपर्यंत द्रावण देत राहावे. अतिसार असलेल्या बालकाला 14 दिवसांपर्यंत झिंक गोळी द्यावी. अतिसार होणे थांबले तरी झिंक गोळी देत राहावी. बाळ्याच्या विष्ठेची लवकर आणि सुरक्षित प्रकारे विल्हेवाट लावावी. अतिसार दरम्यान जे बाळ स्तनपान घेत असेल त्याला स्तनपान सुरु ठेवावे. अतिसार दरम्यान व नंतरही जास्तीत जास्त स्तनपान द्यावे. बाळाला स्वच्छ हातानी स्वच्छ व निर्जंतुक पाणी पाजावे, असे आरोग्य विभागाचे आवाहन आहे.
बॉक्स
ही काळजी घेणे आवश्यक
स्वयंपाक करण्यापूर्वी, बालकाला जेवण भरण्यापूर्वी तसेच बालकाची शी स्वच्छ केल्यानंतर आणि बालकाला साफ केल्यानंतर मातेने हात साबणाने स्वच्छ धुवून घ्यावे. बालक अधिक आजारी असेल, स्तनपान करू शकत नसेल, शौचातून रक्त पडत असेल, कमी पाणी पीत असेल किंवा ताप येत असेल यापैकी कोणतेही लक्षण आढळल्यास तत्काळ आरोग्य संस्थेशी तसेच आशा वर्कर किंवा एएनएम यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी सांगितले.