अमरावती : मेळघाटात कोयलारी व पाचडोंगरी या गावात चार जणांचा अतिसाराने गत आठवड्यात मृत्यू झाला तर ४०० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केला जात आहे. या घटनेची पुनरावृत्ती अमरावती नजीकच्या नया अकोला येथे सोमवारी घडली.
जलवाहिनीतून दूषित पाणी पुरवठा झाल्याने व ते ग्रामस्थाच्या पिण्यात आल्याने अतिसाराची लागण झाली आहे. परिणामी एका युवकाचा मृत्यू झाला तर १५ जण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. यातील तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. ग्रामस्थांनी याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दोषी ठरविले आहे. वलगाव ग्राम पंचायतीने लिकेज पाईपलाईन दुरुस्त केली नाही, असा आरोप आहे.
अमरावतीच्या जिल्हाधिकारी पोहोचल्या कोयलारी-पाचडोंगरीला; पोलीस बंदोबस्तात उपचार
दरम्यान, दूषित पाण्यामुळे चिखलदरा/परतवाडा तालुक्यातील कोयलारी-पाचडोंगरी येथे चौघांचा मृत्यू झाला, तर चारशेवर ग्रामस्थ आजारी पडले. सुट्टीवरून परतलेल्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी सोमवारी दुपारी तडकाफडकी कोयलारी गाठले. यावेळी त्यांनी प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले, तर डॉक्टरांशिवाय कुणाचेही ऐकू नका, असा सल्ला आदिवासींना दिला.