अमरावती - जिल्ह्याच्या अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत रवी राणा या नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहतात. सत्ताधारी महाविकास आघाडीवर निशाणा साधणे असो, किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका असो, त्यांची चर्चा होते. गल्लीतील डान्समुळे तर दिल्लीतील संसदेत केलेल्या भाषणामुळेही त्या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. आताही त्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत, त्या एका ऑडिओ क्लिप मुळे.
युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार एका पीडित महिलेने खासदार नवनीत राणा यांच्याकडे केली. त्यासाठी त्यांनी खासदार राणा यांना कॉल करून आपली परिस्थिती सांगितली व पार्टीच्या कार्यकर्त्यांना समज देण्याची विनंती केली. मात्र, यावर चिडत खासदार नवनीत राणा यांनी पीडितेची उलट तपासणी सुरू करत तुम्ही मला विचारुन लफडा केला का? असा उलट प्रश्न त्या महिलेला विचारला. नवणीत राणा यांची ही मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. खासदार या नात्यानं त्यांच्या भागातील कुणी पीडितांनी... किंवा महिलांनी त्यांच्याकडून अपेक्षा करू नये, मग कुणाकडे करावी? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जातोय.
राणा दाम्पत्याला कोरोनाची लागण
दरम्यान, नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना कोरोनाची लागण झाली आहे. सभा समारंभ व निवडणुकीच्या जल्लोषालामुळे संपर्कात आलेल्या कार्यकर्ते व नागरिकांनी आपली खबरदारी म्हणून करोना चाचणी करून घ्यावी असे आव्हान राणा दाम्पत्यांनी केले आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात ५२५ नवे कोरोना बाधित रूग्ण असून एकूण रुग्ण संख्या ही २४२४ वर गेली आहे.