वनोजा बाग : लसीकरणाच्या दोन टप्प्यात वेगवेगळ्या लसी टोचण्यात आल्याचा मेसेज अंजनगाव सुर्जी तालुक्यात व्हायरल होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या विषयात सामाजिक कार्यकर्ते शंकर मालठाणे व सचिन वाघमारे यांनी तहसीलदारांना निवेदनातून नागरिकांच्या चिंता मांडल्या आहेत.
१७ मार्च २०२१ व १८ मार्चपर्यंत विपुल टाॕॅवर येथे ४५ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले, यावेळी कोव्हॅक्सिनचा डोस देण्यात आला. मोबाईलवर ऑनलाईन मिळणाऱ्या प्रमाणपत्रावर मात्र कोविशिल्डचा नमूद होते. ३० ते ४५ दिवसांनंतर जेव्हा दुसऱ्यांदा लसीकरणाची वेळ आली तेव्हा मेसेजवर नमूद केल्यानुसार काही जणांना कोविशिल्ड ही लस टोचण्यात आली. हा सर्व प्रकार लक्षात येताच लस घेणाऱ्या वृद्ध मंडळीमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. अशाप्रकारे १२० व्यक्तींना डोस दिल्याची चर्चा आहे. याप्रकरणी शंकर मालठाणे व सचिन वाघमारे यांनी तहसीलदार कार्यालयात तक्रार दाखल करीत, तीन दिवसांत संबंधित विषयाची अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. आमदार आमदार बळवंत वानखडे, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, तहसीलदार यांनाही निवेदन देण्यात आले. याप्रकरणी तहसीलदारांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला आहे.
प्रकरणाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. चूक सुधारून लोकांना फोन करून बोलावून लसी देण्यात आल्या. कोणालाही क्राॅसिंग लस देण्यात आली नाही. पहिल्या व दुसऱ्याही डोसलाही कोव्हॅक्सिनच दिल्या गेली. सदर चूक डाटा एन्ट्रीची आहे. याबाबत अहवालाची प्रतीक्षा आहे.
- सुधीर डोंगरे, तालुका वैद्यकीय अधिकारी