प्रहारचे आंदोलन : वणी-विश्रोणी रस्त्याच्या बांधकामाचा मुद्दा, लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वणी ते विश्रोळी स्मशानभूमी रस्त्याचे मंजूर काम तातडीने करण्याच्या मागणीसाठी प्रहार पक्षाने चक्क प्रतिकात्मक प्रेतासह अंत्ययात्रा घेऊन बुधवारी दुपारी जिल्हा परिषद सीईओंच्या कक्षात प्रवेश केला. ‘राम नाम..सत्य है’च्या घोषणांसह जिल्हा परिषदेच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत आलेल्या या आंदोलनकर्त्यांनी बघ्यांचे लक्ष वेधून घेतले तर जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली. चांदूरबाजार तालुक्यातील वणी ते विश्रोळी या स्मशानभूमी रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. याकामाचे कंत्राट रत्नागिरी येथील झाकीर अजीज खान यांना देण्यात आले आहे. जि.प. बांधकाम विभाग कार्यकारी अभियंत्यांच्या पत्रानुसार हे काम ३० आॅगस्ट २०१६ पासून ते २९ मे २०१७ पर्यंत पूर्ण व्हायला हवे होते. परंतु अद्यापही सदर बांधकाम पूर्ण झालेले नाही. या रस्त्याच्या बाजूला मोठ्या नाल्या खोदून ठेवण्यात आल्या असून रस्त्यावर काही ठिकाणी रस्त्यावर गिट्टीचे ढिगारे पडून आहेत. हा रस्ता वणी गावातील स्मशानभूमीपासून जात असून वणी गावातील नागरिकांना स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा नेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुतर्फा खोदून ठेवलेल्या नाल्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचते. ते पाणी गावात शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या कामासंबंधी सर्कलमध्ये नेमलेले अभियंता देखील याबाबत कोणतीच कारवाई करीत नसल्याने प्रहारने संबंधित अभियंता व काम न करणाऱ्या एजन्सीवर कारवाई करावी, अशी मागणी केली. आंदोलनासाठी प्रहारने प्रतिकात्मक अंत्ययात्राच सीईओंच्या कक्षात आणल्याने खळबळ उडाली.यावेळी सीईओ कक्षात उपस्थित नव्हते. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तटाले, अतिरिक्त सीईओ प्रकाश तट्टे यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी पत्र देऊन या रस्त्याचे बांधकाम उद्या २० जुलैपासून सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी मंगेश देशमुख, अतुल शेळके, प्रफुल्ल नवघरे, मंगेश शेळके, सुनील मोहोड, अविनाश बायस्कर, सतीश आकरे, शिवदास शेळके, वसंत वघरे, विनोद बोबडे, अक्षय शेळके, संजय राऊत, अमोल शेळके, प्रफुल्ल सोलव, सुखदेव नवघरे, राम घोम, मयूर देशमुख, वसू महाराज आदी उपस्थित होते.
थेट अंत्ययात्राच शिरली सीईओंच्या दालनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:12 AM