पान ३ ची लिड
परतवाडा : अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सन २०१९ मध्ये करण्यात आलेल्या कर्मचारी भरती प्रकरणात अचलपूर पोलिसांनी शनिवारी केएनके टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या दोन संचालकांना अटक करून रविवारी सायंकाळी अचलपूर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने एकाला २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यापैकी एकजण आजारी पडल्याने त्याला अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.
योगेश महादेव खंडारे (३७, रा. साईनगर, अमरावती) व गौरव नारायण वैद्य (२७, गणेश नगर, परतवाडा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. रविवारी अचलपूर न्यायालयात हजर करण्यासाठी नेण्यापूर्वी योगेश खंडारे आजारी पडल्याने त्याला अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. दुसरा आरोपी गौरव वैद्य याला हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नोकर भरती प्रक्रिया राबविताना अनियमितता केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे.
सन २०१९ मध्ये झालेल्या या सरळसेवा नोकर भरती प्रकरणातील घोळ पाहता सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
नोकर भरती करणाऱ्या केएनके टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालकांना अटक झाल्याने या प्रकरणात सहायक सचिव मंगेश भेटाळू, शिपायासह अन्य कुणाचा सहभाग होता, याचा खुलासा होणार आहे . अचलपूरचे ठाणेदार देवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी तपास करीत आहेत.
संचालकांच्या बयाणातील मुद्दे गुलदस्त्यात
याप्रकरणी अचलपूर पोलिसांनी बाजार समितीच्या काही संचालकांचे बयाण नोंदविले. मात्र, त्यातून काय उघड झाले, पोलुिसांच्या हाती नेमके काय लागले, हे अनुत्तरित आहे. गुन्हा दाखुल झालेल्या महिला आरोपीला अटकपुर्व जामीन मिळाला. मात्र, तीन आठवड्यांनंतरही अन्य दोन आरोपी अचलपूर पोलिसांच्या हाती लागलेे नाहीत. त्यामुळे या प्रकरणातील तथ्य व चेहरे समोर आलेले नाहीत.