अमरावती : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमानुसार शिधापत्रिका पात्र असणार, यावर त्याचा एकत्रित कुटुंबातील दिव्यांग व्यक्तीला धान्याचा लाभ मिळत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासनाच्या अन्नधान्य व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाने दिव्यांग व्यक्तीला स्वतंत्र शिधापत्रिका देण्याबाबत नुकतेच परिपत्रक काढले आहे. सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
शासनाच्या परिपत्रकामुळे प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला स्वतंत्र शिधापत्रिका व धान्य मिळणार आहे. शासनाने निश्चित केलेल्या निकषांत अंतर्गत पात्र दिव्यांग व्यक्तीला नवीन अनुज्ञेय शिधापत्रिका व त्या अनुषंगाने शिधापत्रिकेवर अनुज्ञेय असणारा लाभ त्वरीत देण्यात यावा अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कार्यासन अधिकारी महेश कानडे यांनी परिपत्रकात दिली आहे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमानुसार दिव्यांग व्यक्तीने स्वतंत्र शिधापत्रिका व अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी संबंधित कार्यालयाकडे अर्ज करावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पात्र लाभार्थ्यांची अंत्योदय गट व प्राधान्य गट अशा दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.
कोट
दिव्यांगांना शासनाकडून स्वतंत्र शिधापत्रिका देण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व तहसील कार्यालयांना या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- अनिल टाकसाळे,
जिल्हा पुरवठा अधिकारी