अमरावती : युकेमधून परतलेली एका २३ वर्षीय युवतीचा जिल्ह्यात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला येथीलच एका खासगी रुग्णालयात आयसोलेशन क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. उपचारानंतर सलग दोन आरटी-पीसीआर अहवाल निगेटिव्ह आल्याने तिला डिस्चार्ज देण्यात आला. या रुग्णाचा एनआयव्ही अहवाल अद्याप अप्राप्त असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले.
जिल्ह्यात युकेहून २१ प्रवासी परतले होते. या सर्वांचा विमानतळावर अहवाल निगेटिव्ह आल्याने क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर हे नागरिक जिल्ह्यात परतले. त्यापैकी एका २३ वर्षीय तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामुळे सदर तरुणी १७ डिसेंबरला मुंबई व २३ ला महापालिका क्षेत्रात परतली होती. तिला येथील एका खासगी रुग्णालयात १४ दिवस वैद्यकीय निरीक्षणात ठेवण्यात आले व तिचे सलग दोन नमुने अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. मात्र, तिला पुन्हा १४ दिवस गृह विलगीकरणात राहावे लागणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. सध्या मुंबई व इतरही महानगरात युकेहून परतलेल्या नागरिकांसाठी हीच उपचार पद्धती अवलंबली जात असल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
एनआयव्ही अहवालाची प्रतीक्षा
या तरुणीचा नमुना जिनोम स्टडीकरिता पुणे येथील राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेला आहे. हा अहवाल चार ते पाच दिवसांनी प्राप्त होणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. इंग्लडमधील काही भागात कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत बदल झालेला नवीन विषाणू आढळून आल्याने आता अधिक खबरदारी घेतली जात आहे.