अमरावती : जिल्ह्यात फेब्रुवारीपासून दुसऱ्या लाटेचा उद्रेक असताना पहिल्यांदा शनिवारी नव्या संक्रमितांपेक्षा उपचारानंतर बरे झालेल्या नागरिकांची संख्या अधिक होती. यामुळे जिल्ह्याला काहीअंशी दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात शनिवारी १,०९७ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. १,१६७ नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला. याशिवाय शुक्रवारी ९२२ संक्रमितांची नोंद झाली, तर १,१२३ नागरिकांना संक्रमणमुक्त करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत ८१,७५५ संक्रमितांची नोंद झाली. त्यातुलनेत ६९,७२० रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. याशिवाय १०,८०२ विविध रुग्णालयांसह होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत असल्याची सद्यस्थिती आहे. एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत हे प्रमाण ८५.२८ टक्के आहे. साडेचार महिन्यांपासून सातत्याने संसर्गात वाढ झाल्यामुळे कोरोनामुक्तच्या प्रमाणात काहीअंशी कमी आलेली आहे. यापूर्वी हे प्रमाण ९५ टक्क्यांवर पोहचले होते, हे येथे उल्लेखनीय.
जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाल्यावर त्यांचे परिवारातील अन्य पाच सदस्य संक्रमित आढळून आले होते. त्यांना १८ व्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. पूर्वी १५ दिवस उपचार केल्यानंतर रुग्णांच्या सलग तीन टेस्ट निगेटिव्ह आल्यासच त्यांना कोरोनामुक्त करण्यात येत होते. त्यानंतर जशी कोरोनाग्रस्तांची संख्या वाढायला लागली, तसे डिस्चार्ज देण्याच्या गाईडलाईनमध्ये बदल होत गेले. आता तर असिम्टोमॅटिक रुग्णांना सहा दिवसांतच डिस्चार्ज देण्यात येत आहे.
बॉक्स
सहा दिवसांत डिस्चार्ज, १४ दिवस होम क्वारंटाईन
आता कोरोनाग्रस्तांची संख्या वाढती असल्याने कोरोना केअर सेंटरमधील रुग्णांना सहा दिवसांत डिस्चार्ज देण्यात येत आहे. त्यानंतर १४ दिवस होम क्वारंटाईन राहण्याबाबत या रुग्णांकडून लेखी घेण्यात आहे. मात्र, जिल्हा कोविड सेंटरमधील मध्यम ते जास्त लक्षणे असणाऱ्या रुग्णांना मात्र, त्यांचा संसर्ग कमी झाल्यानंतरच डिस्चार्ज देण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
बॉक्स
होम आयसोलेशनमध्ये उच्चांकी १०,८०२ रुग्ण
जिल्ह्यात ज्या रुग्णाच्या घरी स्वतंत्र रुम व प्रसाधनगृह आहे, त्यांना होम आयसोलेशनची सुविधा दिली जाते. या रुग्णांना खासगी डॉक्टरांसह आरोग्य विभागाचे नियंत्रण कक्षातून दिवसातून दोन वेळा संपर्क केला जातो. याशिवाय ग्रामीण भागात ग्राम सुरक्षा समित्या व महापालिका क्षेत्रात झोननिहाय पथकांद्वारे संबंधित रुग्णांच्या घरी भेटी दिल्या जातात. जर रुग्ण घरी सापडला नाही तर त्या रुग्णाला २५ हजारांचा दंड केला जात आहे.
पाईंटर
पाच दिवसांतील डिस्चार्जची स्थिती
तारीख नवे संक्रमित डिस्चार्ज
११ मे १०१६ ९११
१२ मे १०९२ ८०४
१३ मे ११८८ ९०३
१४ मे ९२२ ११२३
१५ मे १०९७ ११७६