"सरकारच्या फसव्या योजनांची चर्चा बांधावर, टपरीवर करा आणि त्यांची पोलखोल करा"
By गणेश वासनिक | Published: July 10, 2023 05:35 PM2023-07-10T17:35:47+5:302023-07-10T17:36:02+5:30
उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन : अमरावती, अकोला संयुक्त पदाधिकारी मेळाव्यात केंद्र, राज्य सरकारवर टीका
अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ने काय साध्य झाले? आता त्यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या योजना कशा बोगस, फसव्या आहेत, याची चर्चा टपरी, पानठेला, सलून, एसटी, पारावर, बांधावर जेथे-तेथे आणि त्यांची पोलखोल करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी येथे शिवसैनिकांना केले.
संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात अमरावती, अकोला संयुक्त शिवसेना पदाधिकारी मेळाव्याला उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर खा. अरविंद सावंत, खा. विनायक राऊत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार नितीन देशमुख, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, शिवसेना शिक्षक आघाडीप्रमुख ज.मो. अभ्यंकर, माजी खासदार अनंत गुढे, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने, सुधीर सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे, प्रीती बंड, पराग गुडधे, नाना नागमोते आदी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मी विदर्भाच्या दौऱ्यावर येताच विरोधकांच्या पोटात गोळा उठला. मतांची भीक मागायला आल्याची टीका ते करतात. आता माझ्याकडे पक्ष नाही, चिन्ह नाही अन् बापही चोरला. मतांसाठी कुठे फिरणार? कट्टर शिवसैनिकांच्या भेटीसाठी मी आलो आहे. दौऱ्यावर असताना जागोजागी होत असलेले स्वागत बघून मी तुम्हाला देव मानू नाही तर काय, असा उल्लेख त्यांनी शिवसैनिकांचा केला.
नरेंद्र मोदी जगात क्रमांक एकचे नेतृत्व आहे, तर दुसऱ्याचा पक्ष फोडण्याची गरज का पडते? अगोदर शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडली; ही वेळ का आली? भाजपला सत्तेची मस्ती चढली आहे, पण आत्मविश्वास राहिलेला नाही, अशी टीका त्यांनी केली.
मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप करताच अजित पवारांसह नऊ आमदार भाजपच्यासोबत गेले नि मंत्री झाले. भ्रष्टाचार करा अन् भाजपात या, अशी नवी रणनीती सुरू झाली आहे. भाजपचे केंद्र व राज्याचे नेते सकाळी उठले की, माझा जप करतात. परंतु, माझ्यासोबत शिवसैनिक असल्याने भाजप माझे काहीही वाकडे करू शकत नाही, असा टोलादेखील त्यांनी लगावला. दरम्यान लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले. यावेळी खा. अरविंद सावंत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही मनोगत व्यक्त केले.