अमरावती : शिक्षक बदली धोरणबाबत कार्यवाही तसेच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश मिळावे, या मागणीसाठी प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली.
प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य निमंत्रक काळूजी बोरसे, राज्य समन्वयक मधुकर काठोळे, शिक्षक समिती राज्य अध्यक्ष उदय शिंदे, शिक्षक संघ राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे, राष्ट्रवादी शिक्षक संघटना अध्यक्ष संजय जाधव, अखिल दोंदे, संघटना अध्यक्ष देविदास बसवदे, समिती राज्य प्रवक्ते आबा शिंपी, आनंद कांदळकर आदींनी मंत्रालयात ग्रामविकास मंत्री यांची भेट घेतली. यावेळी शिक्षकांच्या समस्यांचे निवेदन दिले. ग्रामविकास मंंत्र्यासोबत झालेल्या चर्चेत शिक्षक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या समस्या ग्रामविकास मंत्र्यांकडे मांडल्या. विद्यार्थी उपस्थितीची सर्व सुविधा पुरवून शाळा सुरू करण्यात यावी. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश पुरविण्यात यावे. जुनी पेन्शन योजनेवर निर्णय घ्यावा. आंतरजिल्हा बदली धोरणात सुधारणा करावी. केंद्रप्रमुखांची पदे भरण्यात यावी, बदल्यावर कार्यवाही करण्यापूर्वी शुद्धीपत्रक काढण्यात यावे आदी मागण्यांचा यात समावेश सोडविण्याची मागणी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकासमंत्री यांच्याकडे केल्याचे शिक्षक समितीचे राज्य प्रतिनिधी राजेश सावरकर यांनी सांगितले.