फोटो पी १८ जावरे
फोटो कॅप्शन : चिखलदऱ्यात विविध पॉईंटवर पर्यटकांची गर्दी, तर दुसरीकडे धामणगाव गढीचा वनविभागाचा नाका बंद आहे.
नरेंद्र जावरे
परतवाडा : वीकएंड पर्यटनाला बंदी असतानाही चिखलदरा पर्यटनस्थळी शेकडो पर्यटक शनिवार व रविवारी पोहोचल्याचे चित्र होते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेत समन्वय नसल्याचे पुढे आले आहे.
शनिवार-रविवारी आठवड्याच्या दोन दिवसांत पर्यटनस्थळावर हजारोंच्या संख्येने पर्यटक गर्दी करीत असल्यामुळे पर्यटकांना बंदी करण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश पूर्वीच दिले आहेत. कोरोना नियम पाहता, तिसऱ्या लाटेचा उद्रेक होऊ नये, यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. त्यासाठी शासन-प्रशासन प्रयत्नशील आहे. परंतु, स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाअभावी पर्यटकांना कुठे अडविले जात होते, तर काही ठिकाणी प्रवेश दिला जात असल्याचे गंभीर चित्र आहे.
बॉक्स
धामणगाव गढीहून बंदी, घटांग मार्गे प्रवेश
धामणगाव गढी येथे प्रादेशिक वनविभागाचा नाका आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशावरून शनिवार आणि रविवारी वाहनांनी आलेल्या शेकडो पर्यटकांना येथूनच परत पाठविण्यात आले. मात्र, चिखलदरा जाण्यासाठी असलेला घटांग, सलोना मार्ग पर्यटकांनी निवडला तेव्हा तेथून चिखलदऱ्यात प्रवेश मिळाला. त्यामुळे प्रशासनाच्या असमन्वयामुळे पर्यटकांना हजारो रुपये खर्च करून नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे