अमरावती : जिल्हा परिषद बदली प्रक्रियेत आदिवासी भागात बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करून मेळघाटात ३ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी गुरुवारी झेडपी कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यासंदर्भात मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांना निवेदन देण्यात आले.
आदिवासी क्षेत्रात ३ वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार, त्यांच्या सर्वसाधारण भागात बदली केली आहे. परंतु सर्वसाधारण क्षेत्रातून आदिवासी भागात बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले नसल्यामुळे ते कर्मचारी आदिवासी भागात रुजू न झाल्यामुळे आदिवासी भागातून सर्वसाधारण भागात बदली झालेले कर्मचारी कार्यमुक्त झाले नाही. तसेच आदेशात १७ ऑगस्ट रोजी कार्यमुक्त केल्याबाबत स्पष्ट नोंद असताना व त्यानंतर वेतन काढण्यात येऊ नये, असे सीईओंच्या आदेशात असतानाही संबंधित कर्मचाऱ्यांना विभागप्रमुखांनी कार्यमुक्त केले नाही. महिला व बालकल्याण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी संजय सोळंके यांची अमरावती येथे बदली झाली आहे. त्यांना हृदयरोगाचा आजार असल्याने वारंवार औषधोपचाराकरिता अमरावतीला यावे लागत आहे. त्यांना धारणीचे बीडीओंनी अद्याप कार्यमुक्त केले नाही. त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश बीडीओंना द्यावे, यासोबतच संगीता भटकर, अनिल चवरे, अनिनाश गावंडे, विठ्ठल घुगे आदींच्या जागेवर अन्य कर्मचाऱ्यांच्या धारणी येथे बदल्या झालेल्या आहेत. त्यांना कार्यमुक्त करण्याबाबत संबंधित विभागप्रमुखांना आदेश द्यावे, किशोर ढवळे, तुषार बेलोकार यांची बदली पर्यायी व्यवस्था झाल्याशिवाय कार्यमुक्त करण्यात येऊ नये, या अटीवर केलेली आहे. याअनुषंगाने जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष पंकज गुल्हाने, लिपिकवर्गीय संघटनेचे सचिव संजय राठी यांनी सीईओंकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे. सोबतच अनुकंपा व आंतरजिल्हा बदलीव्दारे पदभरती प्रक्रियेव्दारे निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी रूजू होता येते. ही बाब सीईओंच्या निदर्शनास पंकज गुल्हाने, संजय राठी यांनी आणून दिली.