अनिल कडू लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : ऐन दिवाळीच्या तोंडावर विधानसभेच्या आचारसंहिता दरम्यान अचलपूर बाजार समितीने निलंबित लेखापालाला सेवेतून बडतर्फ केले. २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षातील आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवत २६ ऑक्टोबरच्या सभेत हा बडतर्फीचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
बडतर्फ लेखापाल यांची नोटीस प्रभारी सचिवांनी स्पीड पोस्टाने बजावली. संबंधित लेखापाल आजारी असल्यामुळे ते परतवाड्यातील खासगी रुग्णालयात औषधोपचार घेत होते. यादरम्यान त्यांच्या सुटीचा अर्ज घेऊन मुलगा बाजार समितीच्या कार्यालयात पोहोचला तेव्हा त्याला हा प्रकार कळला. मुलाने वडिलांच्या बडतर्फीची नोटीस घेण्यास नकार दिल्यावरून स्पीड पोस्टाने ती पाठविण्यात आल्याचे प्रभारी सचिवांनी स्पष्ट केले
दरम्यान, बडतर्फ लेखापालांवर लेखापरीक्षणात गंभीर आरोप आहेत. स्वतंत्र चौकशी पथकात दोषी आढळले आहेत. खोटे पावती बुक छापून लाखो रुपयांची वसुली केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. खुलाशात समाधानकारक उत्तर मिळू शकले नसल्याने कारवाई झाली, अशी माहिती सभापती राजेंद्र गोरले यांनी दिली.
आचारसंहितेचा भंगविधानसभा निवडणूक आचारसंहिता दरम्यान अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची २६ ऑक्टोबरला पार पडलेली संचालक मंडळाची सभा आचारसंहितेचा भंग करणारी ठरली असल्याची तक्रार संबंधित लेखापालांनी अचलपूर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सहायक निबंधक सहकारी संस्था अचलपूर, तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे ७ नोव्हेंबरला केली आहे.
कारवाईची मागणीसभेच्या नोटिसवर प्रभारी सचिवांनी धोरणात्मक विषय विषयसूचीवर घेऊन १५ संचालकांसमक्ष विविध धोरणात्मक विषयांवर चर्चा करून ठराव पारित केले. याच सभेत दोन लाभार्थीना प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे देणगी खर्चाचे धनादेश दिले. मयत व्यक्तीच्या नावेसुद्धा देणगी दिली गेली. हे आचारसंहितेचे उल्लंघन असून कार्यालयीन दस्ताऐवज जप्त करून याबाबीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारकत्याने केली आहे.
"२६ ऑक्टोबरच्या सभेत कुठलाही धोरणात्मक निर्णय झाला नाही. आचारसंहितेपूर्वी पार पडलेल्या बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत ठरवले गेलेले विषय सभेत घेतले गेले. ही सभा प्रशासकीय कामकाजाचा भाग होती. त्यात आचारसंहितेचा भंग नाही." - योगेश चव्हाण, प्रभारी सचिव. अचलपूर बाजार समिती