अमरावती : जिल्हा व सत्र न्यायालयातर्फे राष्ट्रीय लोकअदालतीत ६७५ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. या लोकअदालतीत वाहन अपघात नुकसानभरपाई, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, बँकांची प्रलंबित प्रकरणे, चेक न वटल्याची प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, विवादसंबंधी कायद्याचे दावे, बँक, दिवाणी आणि फौजदारी अपील तसेच इतर दिवाणी आदी संबंधित दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी लोकअदालतीसमोर ठेवण्यात आली होती.
लोकअदालतीतील प्रकरणांची पूर्तता करण्यासाठी जिल्हाभरात २९ मंडळांची निर्मिती करण्यात आली. त्यात न्यायाधीश, अधिवक्ता तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा समावेश होता. लोकअदालतीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातून ३ हजार ७०६ दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ६७५ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
लोकअदालतीच्या माध्यमातून एकूण ५ कोटी ३३ लाख ८३ हजार ३६० रुपये रकमेच्या प्रकरणांचा न्यायनिवाडा झाला. पती व पत्नी असे वादी-प्रतिवादी असलेल्या चार प्रकरणांवरही या लोकअदालतीतून सामंजस्याने तोडगा काढण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष उर्मिला एस. जोशी-फलके व सचिव ए. जी. संताणी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालत यशस्वीरीत्या पार पडली.