अखिल भारतीय आदिवासी संघटना नवी दिल्ली यांनी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हे आदिवासी जनतेची समस्या सोडविण्यात अपयशी ठरल्याच्या कारणावरून त्याच्या घरी जाऊन जनाधिकार उलगुलान आंदोलन शुक्रवारी दुपारी ४ वाजता पोलीस बंदोबस्तात केले. दरम्यान अखिल भारतीय आदिवासी संघटना नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी आमदार पटेल यांच्यावर आदिवासी जनतेच्या समस्या सोडविण्याकरिता आपण अपयशी आहे यासह आपण समाजाकरिता काहीच करत नाही. दोन वर्षात आपण कधीही विधान सभेत समाजाच्या समस्या मांडल्या नाही. इतर समाजाचे आमदार समस्या मांडतात. आपण काय करता, असे तोंडसुख घेतले. त्यादरम्यान आमदार पटेलांनी तब्बल १० मिनिटं शांततेत एकूण घेतले. त्यांनतर आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना कुठलाही संयम ठेवला नसल्याने आमदार त्यांच्यावर भडकले. त्यावेळी संघटनेच्या पदाधिकऱ्यांसोबत त्यांचा वाद झाला. तो वाद पोलिसांनी सोडविला. त्यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदाराविराेधात निषेध व्यक्त करत घोषणाबाजी करून शासकीय विश्रामगृह गाठले तेथे ते शांत बसले नाही तर त्यांनी मोजक्या पत्रकारांना बोलावून आमदार दारू २४ तास दारू पितात ते काय आदिवासी समाजाच्या समस्या सोडविणार, असे वक्तव्य केले. त्याची व्हिडीओ शूटिंग करून तो व्हिडीओ व्हायरल केला. त्यामुळे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी विनाकारण बदनामी केल्याने त्यांनी शुक्रवारी रात्री धारणी पोलिसांत संघटनेच्या पदाधिकऱ्यांविरोधात तक्रार दिली असून, त्या तक्रारी वरून ५० जणांविरुद्ध भादंविकलम १८८, २५९, ५००, ५०४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कोट
आंदोलकांना मी मेळघाटच्या जनतेकरिता काय करतो याची माहिती नाही. त्यांच्या निवेदनात मेळघाटची एकही समस्या नाही तरी सुद्धा मी त्यांची बाजू एकूण घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी मला उलट सुलट बोलणे सुरू केले. त्यावर ते थांबले नाही तर त्यांनी मला हिवाळी अधिवेशनानंतर पाहून घेण्याची धमकी पण दिली. मी दारूच्या नशेत असतो, असे म्हटले ते चुकीचे आहे. त्यामुळे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
- राजकुमार पटेल, आमदार, मेळघाट विधानसभा क्षेत्र