परतवाडा (लोकमत न्यूज नेटवर्क) : अचलपूर शहरात रविवारी रात्री ९.३० वाजतादरम्यान दुल्ला गेट परिसरातील झेंडा काढल्याचा वादावरून दोन समुदाय पुढे आल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जमाव पांगविला.
घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमधील अतिरिक्त पोलीस कुमकसुद्धा बोलवण्यात आली आहे. रात्री संचारबंदीसदृश स्थिती निर्माण झाली. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी रात्रीला विनाकारण बाहेर न निघण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. यादरम्यान दगडफेक झाल्याची माहिती आहे.
अतिरिक्त जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शशिकांत सातव घटनास्थळी पोहोचले असून, उपविभागीय पोलीस अधिकारी नवगिरे अचलपूरचे ठाणेदार माधव गरुड, परतवाड्याचे संतोष ताले, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे.
झेंड्यावरून अचलपूर शहरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.
-अविनाश बारगड, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, अमरावती.