चिखलदरा : अतिक्रमण करणाऱ्या पोलीस पाटलावर पोलिसांनी कार्यवाही न करता मूळ मालकावरच विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यामुळे संबंधितांविरुद्ध कारवाईची मागणी पंडित काळे यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना तक्रारीतून केली आहे.
पंडित किसन काळे यांचे मूळ गाव सोमवारखेडा असून, सध्या ते अंजनगाव तालुक्यातील धाडी पो. दहिगाव येथे वास्तव्याला आहेत. परंतु त्यांचे वडिलोपार्जित घर व दीड एकर शेत आहे. गावातील पोलीस पाटील राजू काळे, मुलगा संजू काळे व शिवा काळे यांनी सदर शेतात अतिक्रमण केले आहे. त्याबाबतची तक्रार ग्रामपंचायत, बीडीओ चिखलदरा व पोलीस ठाण्यात दिली होती.
तक्रारीनुसार पोलीस पाटील व त्यांच्या दोन मुलांनी पंडित काळे यांचा पुतण्या किशोर काळे याला फावड्याने डोक्यावर मारले. यात तो गंभीर जखमी झाला. याची तक्रार चिखलदरा पोलीस ठाण्यात केली. मात्र, उलट आमच्यावरच विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. यासंदर्भात न्याय मिळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण हरी हरिबालाजी एन. यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
कोट
अतिक्रमण काढताना किशोर काळे हा डोक्यावर पडल्याने त्याला मार लागला. तक्रारीवरून पोलीस पाटलाच्या मुलाविरुद्ध सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे.
- राहुल वाढिवे, ठाणेदार
चिखलदरा