अंजनगाव सुर्जी : :शहरातील वादग्रस्त गुंठेवारी लेआऊट सर्व्हे क्र. ८८/२ ची मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्ष मौका पाहणी केली. या लेआऊटच्या मालकाने १५ मीटर डीपी रोडमधील तीन मीटरचा भाग गिळंकृत करून प्लॉटचे दगड डीपी रोडवर लावल्याची स्थानिक रहिवाशांनी तक्रार केली होती.
नगर परिषदेच्या रेकॉर्डवर असलेल्या नझुल मोजणी नकाशानुसार लेआऊटच्या मागील बाजूचा प्लॉट बांधकाम अभियंता दिनेश ठेलकर यांनी मोजायला लावला. १८ मीटर लांबीच्या नकाशानुसार असलेला प्लॉट १६ मीटरच भरला. प्लॉट मोजणाऱ्या याच अभियंत्याने सर्व मोजमापे बरोबर असल्याचा अहवाल दिला होता, हे येथे उल्लेखनीय आहे. वस्तुस्थितीची पाहणी करून मुख्याधिकाऱ्यांनी या ले-आऊट मालकास नोटीस बजावण्याचे आदेश दिले. सोबतच नझूल मोजणी पुन्हा करण्याचे आणि डीपी रोडवरील बांधकामाला स्थगिती देऊन या रोडवरील प्लॉटची खरेदी उपनिबंधकांनी मंजूर करू नये असे, पत्र काढण्याचे आदेश आपल्या कनिष्ठ अभियंत्याला दिले.
सदर ले-आऊट विश्रामगृहापासून हरणे विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे आणि सन २०१९ पासून यावर जिल्हाधिकारी कार्यालयाचा स्थगनादेश आहे. हा आदेश डावलून प्लॉट विक्री व बांधकाम या ले-आऊटमध्ये सुरू आहे.
मुख्याधिकाऱ्यांसह याप्रसंगी मनोहर मुरकुटे, सुदेश मोरे, हरिभाऊ शिंगणे, संजय शेळके, ज्ञानेश्वर मते, अमोल वऱ्हेकर, रवींद्र कान्हेरकर, स्वप्निल घुरडे आदी नागरिक उपस्थित होते.