लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तिवसा नगरपंचायत कार्यालयाचा कारभार पार ढेपाळला असल्याने शनिवारी नगरपंचायत कार्यालयात सायंकाळी ६ वाजता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आढावा बैठकीत नाराजी व्यक्त केली. मुख्याधिकारी पल्लवी सोटे यांना पालकमंत्र्यांनी चांगलेच फटकारले. शहरात विविध समस्या असल्याने त्या निकाली निघत नाही. गढूळ पाणीपुरवठा होतो. त्यावर उपाययोजना का करत नाही, असा संतप्त सवाल पालकमंत्र्यांनी उपस्थित केला. सुरुवातीलाच कार्यालयाच्या आवारात सुरू असलेल्या विकासकामांचे भूमिपूजन का घेतले नाही? सदर काम संरक्षण भिंतीचे असून, ७२ लाखांचे आहे. मी कामासाठी पैसे दिले. त्यामुळे मला का विचारले नाही, असा संतप्त सवाल ठाकूर यांनी केला. अधीक्षक संजय संतोषवारसह अधिकारी व कर्मचारी राजकारण करीत असल्याचा आक्षेप पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. येथील माहिती बाहेर जातेच कशी? त्यामुळे अधीक्षक संतोषवार यांना तात्काळ निलंबित करा, असा आदेश पालकमंत्री ठाकूर यांनी मुख्याधिकारी सोटे यांना दिले. तिवसा शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहे. शहरात स्वच्छता का नाही, असा सवाल उपस्थित केला. तिवसा नगरपंचायतीवर प्रशासक आहे. त्यांच्याकडून वाऱ्यावर कारभार चालत असल्याचे सांगत पालकमंत्र्यांनी कारभाराचे वाभाडे काढले. एकंदर या संपूर्ण आढावा बैठकीत यशोमती ठाकूर येथील कारभारावर संताप व्यक्त केला. यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी नरेंद्र फुलझेले, तहसीलदार वैभव फरतारे, माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे, माजी नगरसेवक नरेंद्र विघ्ने उपस्थित होते.
प्रथम पाण्याला प्राधान्य देण्याचे निर्देशतिवसा शहरात गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे पालकमंत्री ठाकूर यांच्यासमोर महिलांनी व्यथा मांडली. कोट्यवधींचा निधी नगरपंचायतीला आहे. त्यामुळे आधी पाण्याला प्राधान्य द्या, असा दम ना. यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दिला.