जनक्रांती सेनेचा इशारा, एक वर्षापासून रेशन नाही
धारणी : तालुक्यातील हजारो आदिवासी नागरिकांचे एक वर्षापासून नवीन कार्ड तयार झाले आहेत. या कार्डधारकांनी दहा ते वीस वेळा तहसील कार्यालयाच्या चकरा मारून धान्य वितरण करण्याची मागणी केली. परंतु, आजपर्यंत नवीन कार्डवर धान्यपुरवठा सुरू झालेला नाही. याबाबत जन क्रांती सेनेचे संस्थापक मन्नालाल दारसिंबे यांनी धारणीच्या तहसीलदारांना सोमवारी निवेदन देऊन पाच ते सहा दिवसांचा अल्टिमेटम दिला. यानंतर नवीन कार्डधारकांना धान्यपुरवठा न केल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
एकट्या झिल्पी या गावामध्ये २२ लाभार्थींना स्वस्त धान्य योजनेपासून वंचित राहावे लागले आहे. अशाच प्रकारची परिस्थिती मेळघाटातील शेकडो गावांमध्ये हजारो कार्डधारकांची असल्यामुळे याची तात्काळ दखल घेऊन गरजू लाभार्थी धान्य वितरण व्यवस्थेमार्फत धान्य पुरवण्याची व्यवस्था करणे आवश्यक असताना याकडे महसूल विभाग आणि पुरवठा विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप जन क्रांती सेनेने केला आहे. तहसीलदार अतुल पाटोळे यांनी जनक्रांती सेनेचे निवेदन स्वीकारून लवकरात लवकर धान्य वितरणाबाबत कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन दिले.