चांदूर बाजार : अंगणवाडीतून मूग डाळीसह मिळणारे इतर साहित्य अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार तालुक्यातील पालकांतर्फे केली जात आहे.
तालुक्यात एकूण २३६ अंगणवाड्या असून त्यामध्ये १४ हजार बालक हे आहार घेत असतात. पोषण आहारात देण्यात येणाऱ्या निकृष्ट प्रकारच्या मुगडाळ मुळे चिमुकले सुदृढ होणार कसे आणि शरीराबरोबर बौद्धिक विकास कसा होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकारामुळे तालुक्यातील पालक वर्गात रोष पाहायला मिळत आहे. राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री असलेल्या अमरावतीच्या पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
--------------
तालुक्यात अंगणवाड्यांना पुरवण्यात आलेल्या मूग डाळीसंदर्भातील माहिती ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्यांच्या सूचनांनुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही केली जातील.
- विलास दुर्गे, एकात्मिक बाल विकास विभाग
------------------
महिला व बाल विकास अंतर्गत अंगणवाड्यांना पुरविण्यात येणारे निकृष्ट दर्जाचे खाद्य जे कंत्राटदार व अधिकारी पुरवितात, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. या विषयात लोकविकास संघटनेच्या माध्यमातून आम्ही जिल्हाभर आंदोलन करू.
- गोपाल भालेराव, लोकविकास, चांदूर बाजार