अमरावती : जिल्ह्यातील शासकीय व खासगी असे १८ हजार ६४६ पाणी नमुन्यांची तपासणी येथील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत करण्यात आली आहे. त्यापैकी वर्षभरात २ हजार ४९१ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विविध स्रोतांमधून दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. पाण्यामध्ये कोलीफार्म नावाचे बॅक्टेरीया (सूक्ष्म जंतू) नसायला पाहिजे, हे जंतु जर पाणी नमुन्यांमध्ये किंवा पाण्यामध्ये पॉझिटिव्ह असेल तर नमुने दूषित मानले जातात. यामुळे विविध प्रकारचे जलजन्य आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कावीळ टायफाईड, डायरिया, कॉलरा तसेच विविध प्रकारचे पोटाचे विकार होतात. महापालिकेचे क्षेत्र, जिल्ह्यातील विविध पालिका, शहरी व ग्रामीण रुग्णालय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी शासकीय कार्यालये तसेच खासगी तपासणीचा यामध्ये समावेश आहे. सदर नमुने तपासणीसाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडे जानेवारी ते डिसेंबर २०१६ दरम्यान एकूण १८ हजार ६४६ नमुने पाठविण्यात आले होते. यापैकी २ हजार ४९१ पाणी नमुने आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीअंती दोषी आढळले. पाण्यात कोलीफार्म नावाचा बॅक्टेरीयाचे प्रमाण १३ टक्के एवढे आढळून आले आहे. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी गेलेल्या पाणी नमुन्यातून सदर बाब स्पष्ट झाली. महापालिका क्षेत्रातील १० हजार २६७ पाणी नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी सर्वाधिक १४०३ पाणी नमुने सदोष आढळले. सदर पाणी पिण्यायोग्य नसल्याचे प्रमाणपत्र संबंधित विभागाला देण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या नमुन्यांची संख्या ८,३७९ एवढी आहे.कारवाईला नकारघंटाअमरावती : शहरातील अनेक हॉटेल्समध्ये ग्राहकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. यातून हजारो नागरिकांना विविध प्रकारचे आजार होत आहेत. अनेक हॉटेल्समधील पाणी पिण्यायोग्य नसल्याची माहिती आहे. तसा अहवालही संबंधित यंत्रणेला जिल्हा आरोग्य प्रयोेगशाळेतून प्राप्त झाला आहे. यावर कुढलीच कारवाई होताना दिसत नाही, ही खेदाची बाब आहे. हॉटेलमधील पाणी जर पिण्यायोग्य नसेल, तर अन्न व प्रशासन विभागाची ही जबाबदारी नव्हे काय, असा प्रश्न सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत.
जिल्ह्यात २४९१ पाणी नमुने दूषित, विविध आजारांची लागण
By admin | Published: April 08, 2017 12:06 AM