मनाईहुकूम झुगारून शेतात चराई : शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष, डोळ्यांंदेखत पीक फस्त, कारवाईचा देखावा !अमरावती : प्रवेशबंदीचा आदेश लागू असतानाही भातकुली तालुक्यातील गणोरी आणि परलाम या गावांत शिरविण्यात आलेल्या काठेवाडी जनावरांना जिल्हाधिकारी किरण गित्ते, भातकुलीचे ठाणेदार जयराम तावडे आणि बडनेऱ्याचे ठाणेदार यांनी अभय दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीचा संताप उफाळून आला आहे. काठेवाडी गाई-बैल आणि बकऱ्यांना भातकुली उपविभागत प्रवेशबंदी आहे. हा मनाईहुकूम झुगारून पाच मोठे कळप आठ दिवसांपासून गणोरी आणि परलाम गावांत शिरविण्यात आलेत. दोन्ही गावांतील कापणीला आलेल्या शेतातील पिकांमध्ये जनावरे शिरवून शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत पिके फस्त केली गेलीत. अरेरावी करून काठेवाडी जनावरांसोबत असणाऱ्यांनी शेतकऱ्यांवर दबाव टाकला. राब-राब राबून कापणीपर्यंत आलेली पिके काठेवाडी जनावरांच्या घशात घातली जात असल्यामुळे दोन्ही गावांतील गावकरी एकत्र आले. भातकुली आणि बडनेरा पोलिसांत तक्रारी नोंदविल्या. सामूहिक आणि वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी नोंदविण्यात आल्यात. पोलिसांकडून कारवाई करणार की नाही याबाबत विश्वास नसल्यामुळे गुरुवारी काही शेतकरी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना भेटले. होणाऱ्या अन्यायाची माहिती देऊन कठोर कारवाईची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी भातकुलीच्या तहसीलदार वैशाली पाथरे यांना कारवाईचे आदेश दिले. परंतु जणू देखावा असावा असेच सारे घडले. अधिकाऱ्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. ताफा परतला. मात्र काठेवाडींचा डेरा तेथेच होता. रात्रीतून त्यांनी शेतात चराईदेखील केली. शुक्रवारी दुपारी त्यांनी डेरा हलविला नि सायंकाळी पुन्हा ते गावात डेरेदाखल झाले. रात्रभर डेरा कायम होता. शनिवारी पुन्हा दोन कळप या गावांत दाखल झालेत. (प्रतिनिधी)अधिकारी की गुराखी? शेतकरी सैरभैर झाले आहेत. तक्रारी घेऊन बडनेरा, भातकुली पोलीस ठाण्यांत फिरत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार चपला झिजवित आहेत. शेतकऱ्यांची पिके फस्त केली जात आहेत. अधिकारी मात्र कारवाई करण्यास तयार नाहीत. जनावरे हाकलल्याची दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे. मुद्दा असा उपस्थित होतो की अधिकारी कशासाठी? प्रतिबंध असलेल्या जनावरांचा खात्रीलायक बंदोबस्त करून शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण देण्यासाठी की, गुराख्यांप्रमाणे गुरे हाकलण्यासाठी? पोलीस अणि महसूल साऱ्यांचीच भाषा 'जनावरे हाकलली' अशीच आहे. काठेवाडींचे कळप वारंवार येत आहेत. सतत मनाईहुकुमाचे उल्लंघन केले जात असेल तर संबंधित लोकांना अटक करायलाच हवी. का होत नाही ही अटक? कुठे मुरते पाणी? काय करायचे शेतकऱ्यांनी? पिकांना भाव नाही. आहे तीही खाल्ल्यावर गळफास लावायचे काय ? काठेवाडीच्या आश्रयदात्यांना अभयभलेमोठे कळप असणाऱ्या काठेवाडी जनावरांना गावात शिरल्यावर प्यायला पाणी लागते. या जनावरांना गावातील एखाद-दोन लोक आश्रय देतात. पाणी उपलब्ध करून देतात. प्रवेशबंदी असलेल्या जनावरांना आश्रय देण्याच्या कारणावरून गणोरी आणि परलामच्या अशा समाजद्रोही लोकांविरुद्ध महसूल आणि पोलीस खाते कारवाई का करीत नाही? शेतकऱ्याला धमकीकाठेवाडी जनावरे आणि मालकांविद्ध जिल्हाधिकाऱ्यांना भेटून कारवाईची मागणी करणाऱ्या आणि पोलीस तक्रार नोंदविणाऱ्या इर्शाद पठाण या शेतकऱ्याला गणोरीलगतच्या खल्लार गावातून धमकी पाठविण्यात आली. काठेवाडी आणि त्यांच्या समर्थकांची दादागिरी यावरून लक्षात यावी. पोलीस, जिल्हाधिकारी या धमकीची दखल घेतील काय? पोलीस म्हणाले, 'सीएम आहे, तुमचे तुम्ही पाहून घ्या!'सारंग घोंगडे हे युवा शेतकरी 'लोकमत'शी बोलताना म्हणाले, काठेवाडींना पुन्हा डेरा टाकल्यामुळे आणि पिकांची नासाडी करीत असल्यामुळे आम्ही बरेच शेतकरी शुक्रवारी भातकुली पोलीस ठाण्यात गेलो. ते म्हणाले, आज सीएम बंदोबस्त आहे. दोन दिवसांनी निवडणूक आहे. आम्ही येऊच शकणार नाही. तुमचे तुम्ही पाहून घ्या. सारंग यांचा हा अनुभव प्रशासनाची कातडी गेंड्याची असल्याचेच नाही का सिद्ध करीत?'दूध पहुचता हैं'लांब लठ घेऊन गावकऱ्यांच्या अंगावर धावून जाणारे काठेवाडी 'जो करना हैं कर लो, सब जगह हमारा दुध पहुंंचता है' अशा भाषेत गावकऱ्यांना धमकवतात. कारवाईत टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे खरेच दूध पोहोचत असेल काय? रोज पेहोचत असेल की सणावाराला बासुंदीसाठी पोहोचत असेल, असे प्रश्न आता गावकऱ्यांमध्ये गांभीर्याने चर्चिले जात आहेत. तर फडणवीसांनी येऊच नये! गावकरी म्हणतात, देवेंद्र फडणवीसांच्या येण्याने आमची पिके फस्त करू दिली जात असेल तर मुख्यमंत्र्यांनी अमरावती जिल्ह्यात येऊच नये. सीमेचा खेळगणोरी गाव भातकुली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. परलाम हे गाव लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. दोन्ही गावांच्या सीमा शेताच्या धुऱ्याने विभागल्या जातात. भातकुली पोलीस आले की काठेवाडी शेताच्या पलिकडे अर्थात् परलाम सीमेत गुरे नेतात. लोणी पोलीस आले की, परत एक शेत अलीकडे गणोरी हद्दीत गुरे हाकतात. काठेवाडी बुद्धीचातुर्याने सीमेचा खेळ खेळतात. पोलीस साथ देतात. जिल्हाधिकारी किरण गित्ते हे तर जिल्ह्याचे दंडाधिकारी आहेत. त्यांनी दोन्ही पोलीस ठाण्यांना काठेवाडीच्या अटकेचे आदेश का देऊ नये ? गणोरीत शिरलेल्या काठेवाडी पशुपालकांना आम्ही समज देऊन त्या ठिकाणावरून जाण्यास सांगितले आहे. मात्र, त्यांनी जर प्रशासनाचे म्हणणे मानले नाही, तर त्यांना अटक करण्यासंबंधित कारवाई करू. - किरण गित्ते, जिल्हाधिकारी नायब तहसीलदार व पोलिसांनी काठेवाडी नागरिकांना या परिसरातून जाण्याविषयी समजावून सांगितले आहे. त्या ठिकाणी बीट जमादार निगराणी करीत आहे. काठेवाडी जनावरे त्या परिसरात नाहीत. - जयराम तावडे, प्रभारी पोलीस निरीक्षक, भातकुलीकाठेवाडींच्या जनावरांना परलाम शेतशिवारातून हाकलून लावण्यात आले आहे. त्यांना कलम १४४ प्रमाणे नोटीससुद्धा बजावण्यात आली आहे. त्यांनी आदेशाचे उल्लंघन केल्यास अटक करू, ते आता तेथून निघून गेले आहेत. - दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक, बडनेराभातकुली पोलिस ठाण्यात आम्ही तक्रार घेऊन गेलो होतो. मुख्यमंत्री बंदोबस्त आणि निवडणूक असल्याने आम्ही येणार नाही. तुमचे तुम्ही पाहून घ्या, असे सांगण्यात आले. वारंवार विनंती करूनही पोलिसांनी ऐकले नाही.- सारंग घोंगडे, शेतकरी, परलामशेतातील पीक खाल्ले. भर तापात मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेलो. पोलीस तक्रार केली. अधिकारी आले; पण काहीच झाले नाही. काठेवाडींची चराई सुरूच आहे. 'बघून घेण्या'ची मला धमकी आली. - इरशाद खान, शेतकरी, गणोरी
जिल्हाधिकारी काठेवाडींवर मेहेरबान का?
By admin | Published: February 19, 2017 12:13 AM