अमरावती : दूषित पाण्यामुळे तालुक्यातील कोयलारी-पाचडोंगरी येथे चौघांचा मृत्यू झाला, तर चारशेवर ग्रामस्थ आजारी पडले. सुट्टीवरून परतलेल्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी सोमवारी दुपारी तडकाफडकी कोयलारी गाठले. यावेळी त्यांनी प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले, तर डॉक्टरांशिवाय कुणाचेही ऐकू नका, असा सल्ला आदिवासींना दिला.
जिल्हाधिकाऱ्यांसोबत आरोग्य, विद्युत, पाणी पुरवठा, पंचायत विभागाचे अधिकारी होते. त्यांनी कोयलारी व पाचडोंगरी गावांमध्ये जात आदिवासींसोबत संवाद साधला. मृतांच्या कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले. पाचडोंगरी येथील नंदराम धिकार यांनी आपबीती सांगितली. जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेत दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची पाहणी केली तसेच काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्र व चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयाची स्थिती बघितली.
पोलीस बंदोबस्तात उपचार
आदिवासी भागात बरे वाटायच्या आतच जबरीने घरी नेले जात असल्याचा अनुभव आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी तशी माहिती दिल्यामुळे आता दवाखान्यापुढे पोलिसांचा २४ तास बंदोबस्त लावण्यात येणार आहे. केवळ डॉक्टरांचेच ऐका, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी रुग्णांना बजावले.
विद्युत पुरवठा खंडितच
आदिवासींचे जीव धोक्यात आले असताना परिसरातील विद्युत पुरवठ्याचा लपंडाव सुरूच आहे. त्यामुळे अतिरिक्त जनरेटर सर्व ठिकाणी लावण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी दिले.
टँकरही भरेना
विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे टँकरच भरले जात नाही. गावातील विहिरी, हातपंप सर्व सील करण्यात आले आहेत. सौरऊर्जेवरील यंत्रणा ढगाळ वातावरणामुळे कुचकामी ठरली. त्यातून मार्ग काढत कसेबसे टँकर भरून पाणी पाठविले जात आहे.
बेड, टॉयलेट वाढवा
रुग्णसंख्या वाढत असल्याने बेड तसेच मोबाईल टॉयलेट स्वच्छता, स्वच्छ पाणी, योग्य औषधोपचार, औषधसाठा परिपूर्ण ठेवण्यासह सर्व बाबींवर भर देण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले.
आतापर्यंत ३४४ रुग्णांवर उपचार करण्यात आले. थोडे उपचार झाल्यावर आदिवासी लगेच घरी घेऊन जातात. त्यामुळे रुग्णालयापुढे आता पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. परिस्थिती नियंत्रणात येत आहे.
- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती
--------------