परतवाडा (अमरावती) : ‘ताई, तू अजिबात काळजी करू नकोस. तुझा पाठीराखा भाऊ सदैव तुझ्यासोबत आहे.’ शंकरबाबांच्या मानसकन्येने रक्षासूत्र बांधल्यानंतर गतिमंद जैबुन्निसा हिच्या डोक्यावर हात ठेवून जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी तिला निरोगी व आनंदी आयुष्याचा आशीर्वाद दिला. तेव्हा हा प्रसंग पाहून रुग्णालयातील अनेकांना गहिवरून आले. या हृदयस्पर्शी घटनेचे ते साक्षीदार झाले. स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग बालगृह, वझ्झर येथील जैबुन्निसा हिच्यावर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जैबुन्निसा ही पुणे रेल्वे स्टेशन येथे अवघ्या दोन वर्षांची असताना पोलिसांना सापडली होती. पोलिसांनी तिच्या नातेवाइकांचा शोध घेतला. परंतु, कुणीच न मिळाल्याने बाल न्यायालयाच्या आदेशाने ती आजीवन पुनर्वसनाकरिता वझ्झरला पोहोचली. संचालक शंकरबाबा पापळकर यांनी तिला लहानाचे मोठे केले. अलीकडे अमरावती येथील मेडिकल बोर्डची चमू बालगृहातील मुलांची आरोग्य तपासणीकरिता आली असता, जैबुन्निसाच्या तपासणीत तिच्या पोटात गाठ असल्याचे निदान झाले. ती गतिमंद असून अनेक आजारांनी ग्रस्त आहे.
दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ढोले, डॉ. स्वाती खांडे व त्यांच्या चमूने तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातील गाठ काढली. तिला जीवदान दिले. आता तिची प्रकृती उत्तम आहे. अचलपूरचे उपविभागीय अधिकारी उंबरकर यांनी त्याबाबत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना माहिती दिली. बुधवारी शासकीय दौऱ्यावर असताना रक्षाबंधनाच्या पावन पर्वावर कटियार यांनी रुग्णालयामध्ये जाऊन जैबुन्निसाच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यावेळी तिने त्यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या पवित्र बंधनात बांधले.