अमरावती : कोरोनाशी युद्ध सुरू असतानाच आता म्युकरमायकोसीस (काळी बुरशी) आजार या नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. प्राथमिक स्तरावर उपचार झाल्यास या आजाराची जोखीम कमी होऊ शकते. त्यामुळे उपचारयंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच आरोग्य यंत्रणा व इतर विभाग, वैद्यक क्षेत्र, विविध संस्था, संघटना आदी सर्वांनी मिळून नागरिकांमध्ये प्रभावी जाणीवजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी केले.
म्युकरमायकोसिस आजारावरील उपचार व उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी वैद्यक क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, डॉ. प्रफुल्ल कडू, डॉ. बबन बेलसरे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल रोहणकर, सचिव डॉ. संदीप दानखेडे, डॉ. अजय डफळे, डॉ. जयश्री नांदुरकर, डॉ. सरिता पाटणकर, डॉ. क्षितीज पाटील, डॉ. नीरज मुरके, डॉ. स्वप्नील के. शर्मा, डॉ. दिनेश ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.
कोरोना पश्चात रुग्णांमध्ये मधुमेह नियंत्रित नसणे, प्रतिकार शक्ती क्षीण होणे आदी कारणांमुळे या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. काळी बुरशी आजाराविषयी नागरिकांमध्ये जाणीवजागृती होणे आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणा, वैद्यक क्षेत्रासह विविध यंत्रणा, संस्था, संघटनांनी समन्वयाने प्रभावी जनजागृती करावी. प्राथमिक स्तरावर उपचार व काळजी घेतल्यास या आजाराची जोखीम कमी होऊ शकते, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
बॉक्स
निदान आणि तपासणी
कोविड व स्टीरॉईडचा तपशील माहिती घेणे, रक्त तपासणी करणे. सीटी स्कॅन, इंडोस्कोपी व बायोप्सीच्या साह्याने म्युकरमायकोसिसचे निदान करणे सोपे आहे. कोरोनानंतर म्युकरमायकोसिसचा धोका असलेल्यांनी १० ते २० दिवसांच्या आत तपासणी करून घेणे गरजेचे आहे व त्यामुळे संभाव्य धोका टाळता येऊ शकतो, असे आवाहन यावेळी करण्यात आले.