अमरावती : जिल्ह्यात रेमडेसिविरच्या वापरात अनियमितता झाळी असून, ती शोधण्यासोबतच अनियमितता कशी रोखता येईल व दोषींवर प्रस्तावित कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने गुरुवारी पाच सदस्यीय समिती गठित करण्यात आली. ही समिती सात दिवसांत अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहे.
कोरोना रुग्णांसाठी सध्या वरदान ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी बुधवारी भंडाफोड केला. यामध्ये कोविड रुग्णालयातील अटेंडन्ट, महावीर हॉस्पिटलमधील अटेंडन्ट, ग्रामीण रुग्णालय भातकुली येथील डॉक्टर, इर्विन रुग्णालयातील स्टाॅफ नर्स, संजीवनी कोविड सेंटरचे डॉक्टर, लॅब असिस्टंट अशा सहा आरोपींना पकडून त्यांच्याजवळून १० रेमडेसिवीर जप्त केले आहे. सर्व आरोपी हे शासकीय व खासगी कोविड रुग्णालयांशी संबंधित आहे. या इंजेक्शनच्या वापरात अनियमितता कशी झाली, याचा शोध समिती घेणार आहे.
त्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांनीदेखील चार सदस्यीय समिती गठित केलेली आहे. यात निवासी वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट व दोन आरोग्य कमर्चारी यांचा समावेश आहे. ही समिती सर्व कोविड रुग्णालयांतील कागदपत्रांची तपासणी करुन रेमेडेसिवीरच्या वापराची अनियमितता शोधणार आहे. या अहवालाच्या आधारे जिल्हा समिती पुन्हा चौकशी करून अनियमितेत दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा अहवाल सात दिवसांत जिल्हाधिकारी यांना सादर करणार आहे.
बॉक्स
अशी आहे जिल्हा समिती
रेमडेसिविरच्या वापरामध्ये अनियमितता आढळून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने चार सदस्यीय समिती गठित करण्यात आली. यात उपजिल्हाधिकारी मनीष गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, एफडीएचे औषधी निरीक्षक मनीष गोतमारे व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक सुनील वाठोरे यांचा समावेश आहे.
कोट
रेमडेसिविरच्या वापराचे ऑडिट करण्यासाठी आरएमओ यांच्या नेतृत्वात चार सदस्यीय समिती गठित करण्यात आलेली आहे, ही समिती दोन दिवसांत ऑडिट रिपोर्ट सादर करेल.
- श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक