अमरावती : जिल्ह्यात होत असलेल्या या जातीय दंगलीमध्ये भाजपचेच दूषित राजकारण कारणीभूत आहे, पालकमंत्र्यांना दंगलीचा मास्टर माइंड म्हणणाऱ्या अनिल बोंडे यांचे डोके ठिकाणावर आहे का, असा प्रश्न उपस्थित करीत काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र केले तर याद राखा, असा इशारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी डॉ. अनिल बोंडे यांना दिला आहे.
समाजात जातीय तेढ आपणच निर्माण करायची आणि त्याचे खापर काँग्रेसवर फोडायचे, एवढेच काम आता भाजप करीत आहे. भाजपच्या हातून सत्ता गेल्याने अपयशी ठरलेल्या भाजपच्या या स्वयंघोषित राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसह पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे, असेही ते म्हणाले.
अचलपूर येथे झालेला दोन गटातील वादाच्या प्रकारानंतर पोलिसांनी याप्रकरणी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला अटक केली. सदर प्रकरण चिघळू नये याकरिता प्रशासनासह काँग्रेसच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशातच स्वत:ला नेता समजणारे डॉ. अनिल बोंडे या प्रकरणावर मीठ चोळून प्रकरण चिघळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापूर्वीदेखील अमरावती शहरात झालेल्या दंगलीमध्ये कुणाचा हात होता हे सर्वश्रुत आहे. देशात आजवर ज्या दंगली घडल्या त्यातही कोणाचा हात होता हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसवर आरोप करण्याऐवजी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याच पक्षाचा इतिहास वाचावा, काँग्रेसने आजवर समाजात केवळ शांतता राखण्याचे काम केले आहे. परंतु या शांतीला भंग करण्याचे काम करू नये, असा सल्लाही देशमुख यांनी भाजपला दिला आहे.
राज्यात भाजपकडे सत्ता नसल्याने, जातीय दंगल घडवून आणायची आणि त्याचे खापर काँग्रेसवर फोडायचे हे इतकेच काम भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहे, असा आरोपदेखील यावेळी बबलू देशमुख यांनी केला. जिल्ह्यातील ही गंभीर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम प्रशासन, पालकमंत्री यांच्यासह काँग्रेसच्या वतीने केले जात आहे. पालकमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे, असे असताना केवळ प्रसिद्धीसाठी बोंडे काँग्रेसवर निरर्थक आरोप करीत आहेत, त्यामुळे अनिल बोंडे यांनी बोलताना आपली जीभ सांभाळून बोलावे, असे बबलू देशमुख यांनी म्हटले आहे.