अमरावती: अमरावती तालुक्यातील अवैध सावकारांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने २३ ऑगस्टला धाडसत्र राबवून कोट्यवधी रुपयांचे दस्तऐवज जप्त केले. तसेच दुकाने आणि निवासस्थानी धाडी टाकून अवैध सावकारांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईमुळे शहरासह तालुक्यातील सावकारांमध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्हा निबंधक अधिकाऱ्यांनी राबविलेल्या धाडीत मेहर ज्वेलर्सचे नीलेश अनासाने, दीपेश खेरडे, भवानी चौकातील प्रवीण खेरडे, भीमराव तुमराम, प्रकाश कासुर्दे, प्रकाश रामटेके, बेनोडा येथील अनिता चौधरी यांच्या निवासस्थान व प्रतिष्ठानावर धाड घालण्यात आली. तपासणीअंती त्यांच्या मालमत्ता, शेती, प्लाटचे दस्तऐवज, शेकडो कोरे धनादेश, गहाणखत, खरेदी खत जप्त करून पंचनामा करण्यात आला. तालुक्यात अवैध सावकारी मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे. अव्वाच्या सव्वा व्याजदराने कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली जाते. या देवाणघेवाणीत शेती, तसेच स्थावर मालमत्ताच्या इसारचिठ्ठया, कोरे धनादेश घेऊन ५ ते १० टक्क्यांनी रक्कम व्याजाने दिली जात होती. शेतकरी, मध्यम दुकानदार तसेच गरजूंना गंडविण्याचे प्रकार सुरू होते. काहींनी सावकाराच्या जाचामुळे आत्महत्या केल्याच्या घटना घडल्यात.
याबाबत सहकार विभागाचे सहायक निबंधक कार्यालयाला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यावरून जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनात मोर्शीचे सहायक निबंधक एस.टी. केदार, जिल्हा अधीक्षक एन.आर. होले, सहकार अधिकारी सी.एस.पुरी, अंजनगांवचे निबंधक स्वाती गुडधे, वरूडचे निबंधक के.पी. धोपे, चांदूरबाजारचे व्यवहारे यांच्या पथकाने २३ ऑगस्टला हे धाडसत्र राबविले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे.
या धाडसत्रात मोठ्या प्रमाणात कोरे धनादेश, खरेदीखत व अन्य कागदपत्रे हस्तगत करण्यात आली. सर्व कागदपत्रांची तपासणी करून पोलिसांत तक्रार दाखल केली जाईल असे वरूडचे सहायक निबंधक के. पी. धोपे यांनी स्पष्ट केले.